सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेत मॉन्टेसरीला शिकत असलेल्या एका चार वर्षाच्या मुलीला वर्गातच अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोपरखैरणे- सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल शाळेत मॉन्टेसरीला शिकत असलेल्या एका चार वर्षाच्या मुलीला वर्गातच अमानुष मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीनंतरही शाळा व्यवस्थापनाकडून लपवाछपवी सुरू असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी तुभ्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुषी पाटील असे मारहाण झालेल्या मुलीचे नाव आहे.
रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये माँटेसरीला शिकत असलेली आयुषी सोमवारी दुपारी शाळेमध्ये गेली असता आपली मुलगी पडून जखमी झाल्याचा फोन आयुषीच्या पालकांना आला. दुपारी तीन वाजता आयुषीची शाळा सुटत असल्याने तिची आई शाळेबाहेरच उभी होती. आयुषीला किरकोळ लागले असावे असा समज तिच्या आईला झाला होता.
मात्र वर्गात जाऊन प्रत्यक्षात शिल्पा पाटील यांनी आपल्या मुलीला पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. आयुषीच्या संपूर्ण तोंडावर मारहाणीच्या जखमा झाल्या होत्या. तिच्या मानेवर, हाताच्या दंडावर आणि पाठीवरही जखमा झाल्या आहेत.
आयुषीच्या शरीरावरील जखमा पाहून तिला अमानुषपणे मारहाण झाल्याचा संशय शिल्पा पाटील यांना आला. त्यांनी याची माहिती वर्गातील शिक्षकांना विचारली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. यासंदर्भात त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करूनही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शिल्पा पाटील यांनी केला आहे. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी असताना मुलांकडे लक्ष पुरवले जात नसल्याचे सांगत शाळेवर कठोर कारवाईची मागणी आयुषीचे वडील प्रवीण पाटील आणि आई शिल्पा पाटील यांनी केली आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलबाबत अनेकदा तक्रारी येऊनही या शाळेने आजपर्यंत मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक समाजसेवक रवींद्र सावंत यांनी केला आहे.
आयुषीला गंभीर दुखापत झाल्यानंतरही शाळेकडून प्राथमिक उपचार करण्यात आले नाहीत. तसे मेडिकल किट त्यांच्याकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेत जर सीसीटीव्ही कॅमेरे असते तर सत्य उघड झाले असते. त्यामुळे यापुढे तरी मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्राथमिक उपचारासाठी परिचारिका आणि डॉक्टर शाळेत उपलब्ध ठेवण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.
याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, आयुषी पाटील हिला झालेल्या मारहाण प्रकरणी तुभ्रे पोलिस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयुषीला कोणी मारहाण केली आहे याबाबत तपास करून लवकरच शाळेविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत तुभ्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिले आहेत.