माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात पुढील आठवड्यात आरोप निश्चित केले जाणार आहेत.
नवी दिल्ली- माजी मुख्यमंत्री आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांच्याविरोधात पुढील आठवड्यात आरोप निश्चित केले जाणार आहेत. पेड न्यूज आणि निवडणूक खर्च कमी दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपांची ३० मेपासून नियमीत सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाला अशोक चव्हाण यांच्या वकीलांनी अर्ज दिला आहे. त्यात आयोगाला कोणत्या मुद्यावर आक्षेप आहे हे कळवण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्याला उत्तर देणे आम्हाला शक्य होऊ शकेल, असे अर्जात वकीलांनी नमूद केले.
गेल्या आठवडयात चव्हाण यांना निवडणूक आयोगाने समन्स बजावून हजर राहण्यास सांगितले होते. सुनावणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाला आरोप ठेवणे शक्य होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
याआधी अशोक चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला तपासाचे पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने चव्हाण यांना नोटीस बजावली होती.