या आसनात शरीराचा आकार अर्धवर्तुळाशी मिळताजुळता किंवा अर्धवर्तुळासारखा दिसतो. म्हणूनच या आसनाला चक्रासन असंही म्हणतात.
योगा मॅटवर पाठीवर सरळ आणि ताठ झोपावं. पूर्ण शरीराला प्रथम सैल सोडावं. आता दोन्ही पाय दुमडून घ्यावेत. पायाची टाच मांडीजवळ आणण्याचा प्रयत्न करावा. दोन्ही हात कानाजवळ ठेवावेत म्हणजेच हातांची बोटंही आपल्या बाजूला असावीत. (चित्रात दाखवल्याप्रमाणे) आता हळुवारपणे कंबरेला वरती उचलावं. त्यानंतर डोकं वर उचलावं. शरीराचा पूर्ण भार हा दोन्ही हात आणि दोन्ही पायांवर असावा.
चित्रात दाखवल्याप्रमाणे आसन करावे. काही सेकंद चक्रासन या आसनात थांबावं. या आसनात जेवढं शरीर वरती उचलता येईल तेवढे उचलण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला जेवढं थांबता येईल तेवढाच वेळ थांबावं. आसन सोडताना प्रथम मान, डोकं यांना अलगद खाली आणावं. त्याचबरोबर कमरेचा भाग हळुवारपणे खाली आणावा. आता थोडा वेळ विश्रांती करावी.
श्वास
» सुरुवातीला श्वास घ्यावा.
» शरीराला वरती नेताना श्वास थांबवावा किंवा नियमित श्वासोच्छ्वास करावा.
» शरीराचा वरील भाग खाली आणताना श्वास सोडावा.
वेळ
» सुरुवातीला जेवढा वेळ तुम्ही आसनात बसू शकाल तितका वेळ बसावं.
» हे आसन किमान दोन ते तीन वेळा करावं.
आसन करताना घ्यावयाची काळजी
चक्रासन या आसनाची सुरुवात करताना प्रथम पूर्ण शरीराला रिलॅक्स करावं. या आसनात आपण पायाच्या टाचा नितंबाला लावतो आणि शरीराचा वरील भाग वरती उचलतो. पण तुम्हाला पायांच्या टाचा नितंबाला लावून शरीर वरती उचलता येत नसेल तर थोडंसं अंतर ठेवून शरीराला वरती आणावं. शरीराला जेवढं वर उचलता येईल तेवढं उचलावं. काही सेकंद थांबावं. हे आसन सोडताना प्रथम मानेला खाली आणावं. मग कमरेला खाली आणावं. थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुन्हा करावं.
विशेष नोंद
ज्या व्यक्तीचे मनगट, हात, पाठ कमकुवत असेल किंवा दुखत असेल त्यांनी चक्रासन या आसनाची प्रॅक्टिस करू नये. तसंच गरोदर असल्यास थकवा वाटत असल्यास हे आसन करू नये. तसंच हे आसन योगाशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावे.
फायदे
» चक्रासनामुळे पोट कमी होण्यास मदत होते.
» या आसनाने पाठीच्या कण्याला चांगला ताण मिळतो. त्यामुळे तो लवचिक बनतो.
» ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी हे आसन करावे.
विशेष सूचना : हे आसन करताना योगा मॅटवरच करावे. कारण ब्लँकेटवर केल्यास हात सरकण्याची भीती असते.