घानाविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज असल्याचे भारताचा प्रतिभावंत मिडफिल्डर जीन सिंगने बुधवारी म्हटले. ‘‘आम्ही आमच्या नियोजनानुसार खेळू. त्यांच्याशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत. कोलंबियाविरुद्ध पराभव झाला तरी आमचा खेळ उंचावला. घानाविरुद्ध आधीच्या चुका टाळताना सर्वोत्कृष्ट खेळामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न करू. आफ्रिकन आव्हान परतवण्यासाठी आम्ही तयार आहोत,’’ असे जीक्सनने म्हटले. कोलंबियाविरुद्ध भारत हरला तरी जीक्सनने गोलांचा श्रीगणेशा केला.
फिफा वर्ल्डकपमध्ये गोल करणारा तो भारताचा पहिला फुटबॉलपटू ठरला. मात्र जीक्सनने अप्रतिम गोलाचे श्रेय संघ सहका-यांना दिले आहे. ‘‘सहका-यांनी गोल करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून मी त्यांचा आभारी आहे. मी फक्त माझी भूमिका चोख बजावली. फुटबॉल सांघिक खेळ असल्याने गोलाचे श्रेय मला एकटय़ाला जात नाही. मी गोल केल्याचा आनंद आहे. मात्र संघ जिंकला असता तर गोलाचा आनंद द्विगुणित झाला असता,’’ असे जीक्सनने म्हटले.