डिसेंबर महिना सुरू झाला की वेध लागतात ते ख्रिसमसचे! या दिवसांत शाळेतही अभ्यासाची फार कटकट नसते. इंग्रजी मीडियमच्या शाळांत तर स्पोर्ट्स डे, वार्षिक संमेलन, ख्रिसमस पार्टी.. अशी सगळी धमाल, मजा-मस्तीचं वातावरण असतं. ख्रिसमस पार्टी आली की, वर्गाची सजावट आलीच. यावेळच्या ख्रिसमस पार्टीसाठी काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही स्नोमॅन तयार करू शकता. परदेशात या दिवसांत बर्फ पडायला सुरुवात होते. म्हणून कित्येक घरांच्या बाहेर ही स्नोमॅनची प्रतिकृती उभारली जाते.
साहित्य : लहान, मध्यम आणि मोठा असे तीन बॉल. तीन बॉल सापडले नाहीत तर मोठा आणि मध्यम आकाराचा गडू आणि एक पिंगपाँगचा बॉल घ्या. कापूस, फेव्हिकॉल, सॅटिन रिबीन किंवा दोन-तीन रंगांची लोकर, छोटय़ा आकाराचं गाजर, कोलगेटचं वरचं टोपण, काळ्या रंगाच्या टिकल्या किंवा काळी बटणं, रंगीत बटणं, गाजराचा छोटा त्रिकोण, सेफ्टीपिन, जाड काठी
कृती : तीन बॉलना बरोबर मधोमध सेफ्टिपिनने किंवा सुरीने काठी जाईल असं छिद्र पाडा. त्यात काठी घालून तीन बॉल एकमेकांमध्ये अडकवून घ्या. बॉल लावताना सगळ्यात मोठा बॉल खाली, त्यावर मध्यम आणि सगळ्यात वर लहान बॉल बसवा. त्यांना पाडलेल्या गोलामधून जाड काठी बसवा. म्हणजे बॉल हलणार नाहीत. लहान बॉलच्या वर काठी आली तरीही चालेल. आता त्या सगळ्या बॉल्सना बाहेरून कापूस चिकटवा. म्हणजे तो स्नोमॅनप्रमाणे गुबगुबीत दिसेल. छोटय़ा बॉलवर काळ्या रंगाच्या टिकल्यांचे किंवा बटणांचे दोन डोळे लावा. तोंडाच्या जागीही चार-पाच बटणं चिकटवा. गाजराचा काप घेऊन त्याची त्रिकोणी आकाराची चोच तयार करा आणि ती मधोमध चिकटवा. मधल्या बॉलवर शर्टाला असतात त्याप्रमाणे रंगीत बटणं लावा. लोकरीच्या तीन रंगीत धाग्यांचा वेणीप्रमाणे छान गोफ गुंफून स्कार्फप्रमाणे गळ्याभोवती गुंडाळावा. डोक्यावर आलेल्या काठीच्या टोकावर टोपी म्हणून टोपण लावून घ्या. त्यावर लोकर चिकटवून घ्या. म्हणजे टोपी आणि स्कार्फ एकमेकांना मॅचिंग होईल आणि स्नोमॅन छान दिसेल. लोकर नसेल तर कुठल्याही रंगीत कापडाचा वापर करू शकता.
गडू घेतले असतील तर दोन गडू एकमेकांमध्ये फेव्हिकॉलच्या साहाय्याने चिकटवून घ्या. त्यावर बॉल ठेवा. यात तुमचा स्नोमॅन स्थिर राहील. बाकीची कृती वर सांगितल्याप्रमाणे करा.