गावात जवळपास सव्वाशे घरे. प्रत्येक घरात एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही मागे टाकेल असा भव्य देखावा
मुंबई – गावात जवळपास सव्वाशे घरे. प्रत्येक घरात एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही मागे टाकेल असा भव्य देखावा आणि सगळयात गमतीदार भाग म्हणजे गणेशाची स्थापना होईपर्यंत गुलदस्त्यात राहणारी सजावट. या घरांतील सजावटीची स्पर्धा होते आणि विजेते ठरवले जातात. डोंबिवलीतील उंबार्ली गावाने ही परंपरा अनेक वर्षे जपली आहे.
डोंबिवलीपासून अर्धा-पाऊण तासाच्या अंतरावर असलेल्या उंबार्ली गावात आगरी समाजाचे वास्तव्य आहे. त्यामुळे गौरी गणपतीचा उत्सव त्यांच्यासाठी विशेष समजला जातो. लाडक्या बाप्पाचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यावर येथील प्रत्येक कुटुंबांचा भर असतो. गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी साधारण महिना, दीड महिना सजावटीचे नियोजन सुरू होते. कमी खर्चात नयनरम्य देखावे तयार करण्यात गावकरी सराईत झाले आहेत. थर्माकोल, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, करवंटया, पुठ्ठे, गोणपाट, मलमली पडदे, विविधरंगी प्रकाशझोत वापरून सजावट केली जाते.
घरातील प्रत्येक सदस्य आपल्या परीने हातभार लावतो, मात्र त्यात घराबाहेरची कोणतीही व्यक्ती हस्तक्षेप करू शकत नाही. एवढेच नव्हे तर सजावटीची कोणाला कानोकान खबरही लागू दिली जात नाही. गावक-यांच्या कलाकौशल्यांचे कौतुक करण्यासाठी गावात स्थानिक पातळीवर गणेश सजावट स्पर्धा घेतली जाते. ‘आदर्श युवा मंडळ’ ही स्पर्धा घेते. गेल्या २७ वर्षापासून या स्पर्धा भरवण्यात येत आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष जयराम पाटील यांनी दिली.
घरातील सदस्य वगळता इतर कोणाचीही सजावटीसाठी मदत घेतली तर त्या घराला स्पर्धेतून बाद ठरवले जाते. सर्वाच्या घरांतील सजावटीचा उलगडा गणेश चतुर्थीच्या दिवशी होतो. उत्कृष्ट सजावटीला पारितोषिक दिले जाते. यंदाच्या वर्षीही संपूर्ण गावात देखावे उभारण्यात आले आहेत. केवळ स्थिर देखावेच नाहीत तर चलत्चित्रेही आहेत. आकर्षक रोषणाई हे देखील या गावच्या देखाव्यांचे वैशिष्टय आहे.
देखाव्यांचे विषय
यंदा काल्पनिक गणेश मंदिर, दशावतार, गणेश व्हिला, सुंदरगड, मोरेश्वर देवस्थान, महिषासुरमर्दिनी यांसह विविध विषयांवर देखावे उभारण्यात आले आहेत. गावातील काही घरांतील गणपतींचे ५-७ दिवसांनी विसर्जन होते. पण त्यानंतरही या गणपतीसाठी उभारण्यात आलेले देखावे २१ दिवस तसेच ठेवले जातात. त्यामुळे सार्वजनिक मंडळांबरोबर या गावातील घरगुती गणपतींना भेट देण्यास काहीच हरकत नाही.