![mesh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh.gif) |
मेष : नोकरीत बदल संभवतो
व्यावसायिक चर्चाना एकाएकी कलाटणी मिळून नव्या योजना दृष्टिपथात येतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात आणि आकलनात सहज-सुलभता प्राप्त होईल. वारसाहक्काचे, प्रॉपर्टीचे लाभ होत असताना तंटे-बखेड्यांना सामोरे जावे लागेल. वैवाहिक संबंध जुळून येतील. नोकरीत बदल संभवतो. ज्ञानदानाच्या क्षेत्रात प्रसिद्धी आणि कीर्ती होईल. विदेशात जाण्याच्या संधी प्राप्त होतील. वडीलकीच्या नात्याने भावंडांना सहाय्यभूत व्हाल. उष्णतेचे विकार जाणवतील.
|
![rushabh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/rushabh.gif) |
वृषभ : कलाक्षेत्रात उत्कृष्ट प्रतिसाद
स्वार्थ हेसुद्धा परमार्थ साधणारे असतात आणि ते कल्याणही साधत असतात, याची प्रचिती चालू सप्ताहात तुम्हाला येईल. स्वार्थ हा केंद्रबिंदू मानून कर्मचारी आपल्या कामात गुणात्मक आणि संख्यात्मक भर घालून मोठ्या लाभांचे धनी होतील. तुम्हा राशीजनांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन कामात चटपटेपणा येईल. गृह सजावट, पाककृती यांचे शास्त्र आत्मसात कराल. कलाक्षेत्रात रसिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल. |
![mithun](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mithun.gif) |
मिथून : विरोधक निष्प्रभ होतील
राशीने तुम्ही बुद्धिमान असताना राशीपासूनच्या विद्यास्थानातील ग्रहांच्या टोकाच्या भूमिकेत वाढ होऊन प्रत्येक विषयाचा, कायद्याचा कीस काढाल. त्यामुळे ज्ञानाने तुम्ही पुष्ट व्हाल. अनेक अनुयायी तुम्हास प्राप्त होतील. मार्गदर्शन, प्रबोधनाचे काम सर्वस्व ओतून कराल. इंटरव्ह्यूमध्ये उत्तम प्रभाव पाडाल. वक्तृत्वस्पर्धेत यश मिळेल. विरोधक निष्प्रभ होतील. हिशोबात, कामात चोख राहाल. कवी मन प्रभावित होऊन काव्यविश्वात वावराल. |
![karak](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/karak.gif) |
कर्क : आरोग्याच्या कुरबुरी
सामाजिक मान-मान्यता प्राप्त झालेल्या तुम्हा राशीजनांना चालू सप्ताह एकाकी आणि विरक्त जीवन जगावयास लावेल. धनप्राप्तीपेक्षा धनाचे रक्षण-संवर्धन हेच तुमच्यापुढे मोठे आव्हान असेल. अनेक हेलपाटे पडतील आणि अनेक मनमान्या कराव्या लागतील, तेव्हा कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात व्यग्र राहून कौटुंबिक समस्या सोडवण्यात प्रयत्नशील राहाल. आरोग्याच्या कुरबुरी चालूच राहतील. कफ प्रवृत्ती डोके वर काढतील. |
![singh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/singh.gif) |
सिंह : नोकरीत कर्तृत्व वाखाणले जाईल
चालू सप्ताहात तुम्ही काहीसे ऐषारामाकडे झुकत असल्यामुळे व्यावसायिक प्रतिकूलतेला तुम्हास सामोरे जावे लागेल. कौटुंबिक सहलींचे आयोजन कराल. सम व्यावसायिकांच्या ओळखी होतील. विद्यार्थी व्यावसायाभिमुख शिक्षणाकडे वळतील. विनोदी वक्तव्यांनी सभासंमेलने गाजवाल. नोकरीत कष्टदायक, किचकट कामे करावी लागतील; पण त्यातील तुमचे कर्तृत्व वाखाणले जाईल. मर्दानी खेळात नैपुण्य मिळवाल. विवाहाच्या प्रतीक्षेत असणा-यांचे विवाहयोग जुळून येतील. |
![kanya](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kanya.gif) |
कन्या : कला, क्रीडा, वक्तृत्वाचा उत्कर्ष
तुम्हा राशीजनांना चालू सप्ताह विद्यार्जनाबरोबरच कला, क्रीडा, वक्तृत्व या दृष्टीनेही उत्कर्षकारक दिसतो. कायदेशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, औषध निर्मितीशास्त्र या विषयांमध्ये विशेष गोडी उत्पन्न होईल. त्यांचा सखोल अभ्यास करून प्रबंधाद्वारे नवीन विचार मांडाल. चालू साडेसातीत शनी ‘पायी’ आला असल्यामुळे या काळात कोणतेही काम करताना घिसाडघाई न करता विचारपूर्वक पावले उचला. संशयी वृत्ती टाळा. |
![tula](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/tula.gif) |
तूळ : रखडलेल्या कामांना हिरवा कंदील
तुमच्या राशीस साडेसाती चालू असताना राशीस्थानचा बलवान शनी आणि रविशुक्र-शुक्रबुधाची अनुकूलता यातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या मार्गदर्शनातून बराच काळ रखडलेल्या कामांना हिरवा कंदील मिळेल. कामे मार्गी लागण्यासाठी त्रुटींची पूर्तता कराल. मन संतुलीत ठेवताना जिभेचा तोल जाऊन आपत्तींना सामोरे जावे लागेल. मान- सन्मानाचाही वीट येईल. सत्याची कास धरून कर्म करण्याचा संदेश साडेसाती तुम्हाला देत आहे. |
![wrachik](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/wrachik.gif) |
वृश्चिक : रसिक मित्र भेटतील
राशीस्थानी मंगळ-राहू; त्यातच साडेसाती! त्यामुळे भावना आणि कर्तव्य यांच्यात खोल संघर्ष निर्माण होऊन योग्यायोग्यतेबाबत संभ्रम निर्माण होईल. म्हणून अत्यंत विचारपूर्वक आणि शांतपणे कामे हाती घ्या. रसिक मित्र भेटतील. त्यांच्याबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम आखाल. नाट्याभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकाल, व्यावसायानिमित्त परदेश दौरा होईल. विवाहेच्छुकांचे मनपसंत वैवाहिक संबंध जुळून येतील. निसर्गकाव्य रचाल. |
![dhanu](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/dhanu.gif) |
धनू : अनाठायी खर्च होतील
तुमची समाजप्रियता आणि सेवाभाव प्रकर्षाने जाणवेल, असा हा सप्ताह आहे. सामाजिक कार्यात मौलिक सल्ला द्याल. प्रभावी व्यक्तींच्या संपर्कात येऊन व्यावसायिक दौरे लाभदायक ठरतील. खर्च मात्र अनाठायी होतील. मातुल घराण्याचे संबंध नोकरीत फायदेशीर ठरू शकतात. उत्तम संगीतज्ज्ञ म्हणून नावलौकिक होईल. मानवी स्वभावाचे पैलू दाखवणारे कथालेखन कराल. औषध निर्मितीशास्त्र, एक्स-रे तंत्रज्ञान यातील विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होईल. अन्नबाधा संभवते. |
![mesh1](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/mesh1.gif) |
मकर : चाकोरीबद्ध जीवनशैलीकडे कल
डबघाईला आलेल्या व्यवस्थेला तुमचे ज्ञान आणि तुमचा अनुभव यानिशी ऊर्जितावस्था प्रदान करण्याच्या कामास वाहून घ्याल. रसायनशास्त्र, औषध निर्मितीशास्त्र, उद्योग प्रशासनशास्त्र यातील विद्यार्थी बाजी मारून देतील. अवांतर ज्ञानाची कमतरता जाणवेल. चाकोरीबद्ध जीवनशैलीकडे कल राहील. पण त्याची रुखरुखही वाटणार नाही. विमानसेवा कंपनीतील कर्मचा-यांना चालू सप्ताहात दिलासा मिळेल. गुंतवणुकींच्या प्रलोभनांना किती बळी पडायचे, याचा सारासार विचार कराल. |
![kumbh](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/kumbh.gif) |
कुंभ : गायकी उत्तम जोपासाल
तुमच्या बुद्धिमत्तेला शास्त्राची जोड प्राप्त होऊन केलेले मार्गदर्शन, सुचवलेल्या उपाययोजना, यातील संदिग्धतेमुळे त्यांना मुठमाती मिळण्याची शक्यता दिसते. संवादकौशल्य वृद्धिंगत करण्याची गरज तुम्हालाही जाणवेल. आपल्या कष्टांचे श्रेय आपल्यालाच मिळेल याची काळजी घेणे हिताचे. गायकी उत्तम जोपासाल, पण तिला बाथरूममध्येच बंदिस्त ठेवाल. काहीही झाले, तरी गुण फार काळ लपणार नाहीत. ते चेह-यावर नक्कीच प्रकट होतील. |
![meen](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/10/meen.gif) |
मीन : संमिश्र फल
चालू सप्ताह हा तुम्हास संमिश्र फल देणारा दिसतो. वेळेचे नियोजन करून प्राप्त होणा-या संधींची गुणवत्ता पारखून घेणे आवश्यक ठरेल. तुमच्या राशीजन्य द्विधा परिस्थितीमुळे निर्णयप्रक्रियेवर ताण पडून येणारे नैराश्य अध्यात्मचिंतनाने झटकून टाकाल आणि प्राप्त परिस्थितीत समाधानी राहण्याचा प्रयत्न कराल. सुखी वैवाहिक जीवनाचे मर्म जाणून घ्याल. तुमच्या चित्रकलेच्या वैचित्र्यातून प्रसिद्ध व्हाल, सौंदर्यप्रसाधनांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. |