बंगळुरू – ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करणा-या ‘एसआयटी’ने तीन संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. संशयितांच्या कपाळावर टिळा आणि कानात बाळी असली तरी त्यांच्या धर्माबाबत तर्क काढणे शक्य नाही. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मारेक-यांनी तसे केले असावे, असे अधिका-यांनी स्पष्ट केले. संशयितांनी घटनास्थळी रेकी केली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्या हाती लागले आहेत, अशी माहिती एसआयटीचे प्रमुख बी. के. सिंह यांनी दिली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीच्या आधारे रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. दोन चित्रकारांनी ती काढली आहेत.
दोघांच्याही रेखाचित्रांमध्ये साम्य आहे, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत २०० ते २५० लोकांची चौकशी करण्यात आली आहे. ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल एकच असल्याचे पुरावे अद्याप मिळाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.