अपेक्षेप्रमाणे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी लक्ष्मीकांत पार्सेकर यांची निवड झाली आहे. सुरुवातीपासून मुख्यमंत्रीपदासाठी पारसेकर यांचे नाव आघाडीवर होते.
नवी दिल्ली – अपेक्षेप्रमाणे गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर काही वेळातच लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीपासून मुख्यमंत्रिपदासाठी पार्सेकर यांचे नाव आघाडीवर होते.
गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकरही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र मुख्यमंत्रिपदी पार्सेकर यांची निवड झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असण्याचा पार्सेकरांना मुख्यमंत्रिपदासाठी फायदा झाला.
राज्याचे आरोग्यमंत्री असणारे पार्सेकर गोव्याच्या मानड्रेम विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. भाजप नेते राजीव प्रताप रुडी यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पार्सेकर यांच्या नावाची घोषणा केली. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस्को डिसूझा यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला होता.
मात्र डिसूझा यांच्या पाठीशी सरकार अडचणीत येईल इतक्या आमदारांचे बळ नसल्याने, त्यांचा बंडाचा सूर नरमला व त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली.
रविवारी होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पर्रिकर यांची देशाच्या संरक्षण मंत्रिपदी नियुक्ती होणार आहे. त्यामुळे मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी दुपारी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मागच्या दोन वर्षांपासून पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होते.
भाजप संसदीय समितीची शनिवारी सकाळी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत गोवा भाजप विधिमंडळ नेतेपदी कोणाची निवड करायची यावर चर्चा झाली. संसदीय समितीच्या बैठकीत गोव्यातील राजकीय स्थितीवर तसेच उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर कोणाला पाठवायचे यावर चर्चा झाल्याचे भाजपचे सरचिटणीस जे.पी.नड्डा यांनी सांगितले.