गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाला आहे. त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुक्ता आहे.
पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश निश्चित झाला आहे. त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुक्ता आहे. पर्रिकर यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्यांची निवड तितक्या सहजतेने होणार नाही हे ही निश्चित आहे.
गुरुवारपर्यंत गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र आर्लेकर आणि आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. मात्र आता गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस्को डिसूझा यांच्यावतीने त्यांच्या समर्थक आमदारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी डिसूझा यांच्या नावाचा पक्ष विचार करत नसल्याबद्दल डिसूझा यांच्या समर्थक आमदारांनी पक्षाला आपली नाराजी कळवली आहे.
डिसूझा यूकेमध्ये होते शुक्रवारी संध्याकाळी ते गोव्यामध्ये दाखल होत आहेत. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर, नव्या मंत्रिमंडळात डिसूझा यांनी कोणतेही पद स्वीकारु नये असे डिसूझा यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
मी राजीनामा दिल्यानंतर दोन तासात नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल असे पर्रिकर यांनी सांगितले. गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी शनिवारी सकाळी दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे. गोव्याचा पुढला मुख्यमंत्री कोण असावा याबाबत पर्रिकरांनी केंद्रीय नेतृत्वाला आपले मत सांगितले आहे. पर्रिकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.