वैदहीने आसामवर रेखाटलेले चित्र गुगलच्या होमपेजवर डुडल म्हणून दिसत आहे. गुगलने ‘मला जायला आवडेल असे भारतातील ठिकाण’ असा विषय दिला होता.
मुंबई– भारतातील प्रमुख सण, घटना, व्यक्ती यांना विशेष डुडलच्या माध्यमातून सन्मान देणा-या गुगलने खास बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्याच्या वैदही रेड्डीने बाजी मारली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाचे चित्र बालदिनी गुगलच्या होमपेजवर डुडल म्हणून प्रसिध्द करण्यात येणार होते. त्यानुसार वैदहीने आसामवर रेखाटलेले चित्र गुगलच्या होमपेजवर डुडल म्हणून दिसत आहे. गुगलने ‘मला जायला आवडेल असे भारतातील ठिकाण’ असा विषय दिला होता. मुलांच्या कल्पकतेला चालना देण्यासाठी गुगलने या विषयाची निवड केली होती.
वैदहीने या चित्रसाठी नैसर्गिक आणि सांस्कृतिक नंदनवन असलेल्या आसामची निवड केली. या चित्रातून वैदहीने आसामचे वन्यजीवन, संस्कृती आणि निर्सगसौदर्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना लहान मुलांबद्दल प्रचंड प्रेम होते. त्यांचा जन्मदिवस हा भारतात दरवर्षी बालदिन म्हणून साजरा केला जातो. लहान मुलांमध्ये चाचा नेहरु म्हणून लोकप्रिय असलेले पंडितजी लहानमुलांकडे देशाचे भविष्य म्हणून पहायचे.