गुजरातमधील एका कंपनीच्या मालकाने आपल्या कामगारांना चारचाकी गाडी, घर आणि सोन्याचे दागिने दिवाळीचा बोनस देण्याचे जाहीर केले आहे.
सुरत- गुजरातमधील एका कंपनीच्या मालकाने आपल्या कामगारांना चारचाकी गाडी, घर आणि सोन्याचे दागिने दिवाळीचा बोनस देण्याचे जाहीर केले आहे. गुजरातमधील सुरत येथे १९९२ मध्ये स्थापना झालेली सुप्रसिद्ध हरिकृष्णा एक्स्पोर्ट या हिरे कंपनीतील १२०० कर्मचा-यांना हा दिवाळीचा बोनस देणार आहे.
दिवाळीचा बोनस म्हणून कर्मचा-यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात चारचाकी गाडी, फ्लॅट, किंवा सोन्याचे दागिने हे तीन पर्याय कंपनीचे मालक सावजी ढोलकीया यांनी दिले होते. यातील ५०० कर्मचा-यांनी चारचाकी वाहनाचा पर्याय स्वीकारला आहे. ५७० जणांनी दागिने तर २०७ जणांनी फ्लॅट घेण्याचे ठरवले आहे.
आमच्या कंपनीतील कर्मचा-यांच्या कष्टामुळेच मी हे दिवस बघू शकलो. कामगारांना आम्ही कामाचे टार्गेट दिले होते आणि त्यांनी ते पूर्ण केले. कामगारांमुळे कंपनीने सहा हजार कोटींचा पल्ला गाठला आहे. यामुळे कामगारांना ५० कोटी रुपये अर्थात प्रत्योकी सरासरी तीन लाख ६० हजार रुपये वाटप करणार असल्याचे ढोलकीया यांनी सांगितले.
मागिल २०११ पासून दरवर्षी अशाच प्रकारे कामगारांना कामाचे टार्गेट दिले होते. त्यावेळी ७२ कामगारांना चारचाकी गाडी देण्यात आली होती. मागच्या वर्षी मी कार घेतली. त्यामुळे यावर्षी मी कंपनीतर्फे राबवण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात ३ बीएचकेचा फ्लॅट घेत असल्याचे एका कर्मचा-याने सांगितले. त्यासाठी लागणारी सुरुवातीची रक्कम ३.६० लाख रुपये कंपनी देणार असल्याचेही त्याने सांगितले.
तर माझ्याकडे कार आणि घर असल्याने मी यावर्षी तितक्याच किमतीचे पत्नीसाठी दागिने घेणार असल्याचे येथील एका अभियंत्याने सांगितले.
येथील कामगार आणि अभियंत्याला दरमहा एक लाख रुपये वेतन मिळते. तसेच येथील हिरे कामगार महिन्याला तीन लाख ४९ हजार रुपये कमावतो, असे ढोलकीया यांनी सांगितले. हे सर्व कामगारच कंपनीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांना जास्तीत जास्त खूष ठेवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो, असे ते म्हणाले.