घरच्या गणरायाला वंदन करण्याकरता गावी जाण्यासाठी आतुर असलेल्या कोकणवासीयांसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून गणपतीनिमित्त काही विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/11/kokan-railway.jpg)
मुंबई – घरच्या गणरायाला वंदन करण्याकरता गावी जाण्यासाठी आतुर असलेल्या कोकणवासीयांसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून गणपतीनिमित्त काही विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.
या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये पश्चिम रेल्वेकडून वांद्रे टर्मिनस-मडगाव (०९००९) ही विशेष गाडी २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान रविवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री १२.१५ या वेळेत सुटणार असून ही गाडी त्याच दिवशी पहाटे ४.३० वाजता मडगावला पोहोचणार आहे. तर मडगाव-वांद्रे टर्मिनस (०९०१०) ही विशेष गाडी २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान रविवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री ८.०० वाजता सुटणार असून दुस-या दिवशी रात्री १.२० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचणार आहे.
या गाडय़ा अंधेरी, बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, पेरनेम, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबणार आहे.
अहमदाबाद-मडगाव (०९४१६, व्हाया वसई रोड) ही विशेष गाडी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक सोमवार, गुरुवार आणि रविवार दुपारी ४.५५ या वेळेत सुटणार असून दुस-या दिवशी दुपारी ४.३० वाजता मडगावला पोहोचणार आहे. मडगाव-अहमदाबाद (०९४१५) ही त्रिसाप्ताहिक विशेष गाडी २६ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवार, शुक्रवार आणि सोमवार रात्री ८.०० वाजता सुटणार असून दुस-या दिवशी सायंकाळी ८.०० वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे.
गाडी क्रमांक ०९००९ व ०९४१६ या गाडय़ांचे आरक्षण ४ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडूनही आणखी दोन गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यात लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव (०१०९१) ही गाडी १५ ऑगस्ट रोजी रात्री १२.४५ वाजता सुटणार असून मडगावला ती दुपारी २.१० वाजता पोहोचणार आहे.
तर मडगावहून (०१०९२) ही गाडी १५ ऑगस्ट रोजी दुपारी २.४० वाजता सुटणार असून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पहाटे ५ वाजता पोहोचणार आहे. या गाडय़ा ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, पेरनेम, थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबणार आहेत.