खेड तालुक्यातील धामणंद पंधरागांव, काडवली, केळणे येथील नद्यांमध्ये बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
चिपळूण – खेड तालुक्यातील धामणंद पंधरागांव, काडवली, केळणे येथील नद्यांमध्ये बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मंडल अधिकारी, तलाठी दुर्लक्ष करीत असल्याने सरकारचा महसूल बुडत आहे. यामुळे जिल्हाधिकारी राजीव जाधव व तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी या अधिका-यांवरच कारवाई करावी, अशी चर्चा सुरू आहे.
तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी शनिवारी एका सक्शन पंपासह ६०-६५ होडय़ा जप्त केल्या. वाळू उत्खननास परवानगी मिळालेली नसतानाही खेड तालुक्यातील काही भागांमध्ये बेकायदेशीरपणे वाळू उत्खनन होत असल्याची ओरड होती. या उत्खननासाठी चिपळुणातून होडय़ा नेल्याची चर्चा आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्या सूचनेनुसार खेडचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी धडक कारवाई करीत एका सक्शन पंपासह ६०-६५ होडय़ा जप्त केल्या आहेत.
मात्र, दुसरीकडे धामणंद पंधरागांव, काडवली, केळणे येथील नद्यांमध्येही बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या वाळू उत्खननावरून या व्यावसायिकांमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. यामुळे वाळू युद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. या नद्यांमध्ये बेकायदा वाळू उत्खनन होत असतानाही मंडल अधिकारी व तलाठी दुर्लक्ष का करीत आहेत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.