पार्टीमध्ये सुरुवातीस चिअर्स, चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण, जेवणापूर्वी ‘वदनी कवळ’ आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ।।१।।
वॉर्मिग अपसाठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रूटपंच प्यायला शिकलो,
पण, आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो ।।२।।
चायनीज नुडल्स काटय़ाने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण, शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो ।।३।।
हाताने वरणभात, ताकभात कालवून खायची लाज वाटू लागली,
आणि काटय़ा-चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ।।४।।
पावभाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,
पण, गरम वरणभातावरची तुपाची धार विसरलो ।।५।।
बिर्याणी, फ्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,
पण, मसालेभात, वांगीभात म्हणजे काय? या प्रश्नात अडखळलो ।।६।।
पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ।।७।।
दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,
पण, आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो ।।८।।
सॅलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,
पण, कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ।।९।।
इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,
आणि अळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाटय़ाची भाजी बेचव वाटू लागली ।।१०।।
मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले
आणि फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही? म्हणून विचारू लागलो ।।११।।
साखरभात, गव्हाची खीर, लापशी इतिहासजमा झाली,
अन् स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ।।१२।।
मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नॅपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो
पण, पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ।।१३।।