दोन मित्रांच्या क्षुल्लक मस्करीचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखरणे भागात घडली.
नवी मुंबई – दोन मित्रांच्या क्षुल्लक मस्करीचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना नवी मुंबईतील कोपरखरणे भागात घडली. यात स्क्रू-ड्रायव्हरचा वापर केल्याने एक जण जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विलास ओंबडे आणि अमोल वरखाडे हे दोघे ९ नोव्हेंबर रोजी माथाडी रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेले होते. या वेळी अमोलने रक्तदान केले, मात्र डॉक्टरांनी विलासला रक्तदान करू दिले नाही.
त्यामुळे विलासची त्याच्या मित्रांनी मस्करी केली. याच रागातून शनिवारी रात्री विलासने सेक्टर-१९ येथील साई मंदिराजवळ उभ्या असलेल्या अमोलवर अचानक मागून हल्ला केला. या हल्ल्यात स्क्रू-ड्रायव्हरचा वापर केल्यामुळे अमोलचा डावा खांदा, हनुवटी आणि मानेवर जखमा झाल्या आहेत. दरम्यान, सारंग आणि संकेत या अमोलच्या मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कोपरखरणे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून विलास पसार आहे.