पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू असल्याचे भासवून एका भामटयाने चक्क बीबीसीची फसवणूक केली आहे.
लंडन – पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू असल्याचे भासवून एका भामटयाने चक्क बीबीसीची फसवणूक केली आहे. नदीम आलम असे या भामटयाचे नाव आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू नदीम अब्बासी यांचे नाव धारण करुन, आलम बीबीसीच्या क्रिकेट चर्चांच्या कार्यक्रमांमध्ये तज्ञ म्हणून सहभागी होत होता. फक्त ह्यूडर्सफिल्डसाठी स्थानिक क्रिकेट खेळणारा आलम नदीम अब्बासी बनून बीबीसी वर्ल्ड न्यूज, बीबीसी एशियन नेटवर्क आणि रेडिओ फाईव्ह लाईव्हच्या चर्चासत्रांमध्ये सहभागी झाला होता.
या सर्व कार्यक्रमांमध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राही सहभागी झाले होते. आकाश चोप्रांसह तो या कार्यक्रमांमध्ये क्रिकेट तज्ञ म्हणून आपली मते मांडत होता. जेव्हा अब्बासी यांना हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी संताप व्यक्त करताना नदीम आलम मला कुठे भेटला तर, देशाच्या प्रतिष्ठेशी खेळल्याबद्दल मी त्याला चांगला धडा शिकवीन अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
तसेच बीबीसी ही मोठी संस्था असून, आपल्याकडे तज्ञ म्हणून बोलवताना त्या माणसासंदर्भातील सर्व माहितीची नीट खातरजमा करुन घेण्याची जबाबदारी बीबीसीची आहे असे अब्बासी म्हणाले.
अब्बासी हे यष्टीरक्षक फलंदाज होते. १९८९मध्ये पाकिस्तानसाठी ते तीन कसोटी सामने खेळले होते. ४६ वर्षांचे अब्बासी सध्या रावळपिंडी संघाचे प्रशिक्षक असून, १९९६ च्या विश्वचषक स्पर्धेत एकदाच ते दूरचित्रवाहिनीवर चर्चेसाठी आले होते. बीबीसीने नदीम अब्बासी यांची माफी मागितली असून, या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.