कोळसा मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांच्या कानूपर येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने करणा-या भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
कानूपर – कोळसा खाण वाटपातील घोटाळयावरुन कोळसा मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांच्या कानूपर येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने करणा-या भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये रविवारी जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे डझनभर कार्यकर्ते जखमी झाले. भाजपा नेते कालराज मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जैस्वाल यांच्या पोखारपूर येथील निवासस्थानावर मोर्चा आयोजित केला होता.
आंदोलक निवासस्थानापासून 200 मीटर अंतरावर असताना, पोलिसांनी अडथळे आणून भाजप कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी घोषणा देणा-या कार्यकर्त्यांनी जैस्वाल यांच्या पोस्टरला काळे फासले. भाजप कार्यकर्त्यांची ही कृती तेथे उपस्थित असलेला कॉंग्रेस कार्यकर्त्यांना सहन झाली नाही. दोन्ही बाजूंनी आधी शाब्दीक बाचाबाचीला झाली व लगेचच बाचबाचीचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये महिला कार्यकर्त्यांनाही सोडले नाही.
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. गोविंद नगरचे भाजप आमदार सत्यदेव पचौरीही या हाणामारीत जखमी झाले. अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. याआधी जैस्वाल उपस्थित असलेल्या दादानगर भागातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले होते. या घटनेनंतर जैस्वाल यांच्या निवासस्थानाबाहेरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.