कोकण विकास कार्यक्रमातील १,९०० कोटींचा निधी चालू आर्थिक वर्षातच खर्च केला जाईल, अशी ग्वाही अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई – कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी तरतूद करण्यात आलेला कोकण विकास कार्यक्रमातील १,९०० कोटींचा निधी चालू आर्थिक वर्षातच खर्च केला जाईल, अशी ग्वाही अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. आतापर्यंत यातील साडेचार हजार २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोकणच्या विकासासाठी सरकारने २००९-१०, १०-११ आणि २०११-१२ या तीन वर्षासाठी कोकण विकास कार्यक्रमांतर्गत पर्यटन विभागासह विविध विभागांमार्फत राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१२ ही तारीख निश्चित केली होती.
मात्र आतापर्यंत यातील बहुतेक निधी खर्च करण्यात आला नसल्याबाबत अॅड. आशीष शेलार, निरंजन डावखरे, विजय गिरकर आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देताना कोकणात विकासाची अनेक कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुळक यांनी सांगितले.