दापोली आंजर्ले ताडाचा कोंड वाडीतून जाणा-या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विधानसभेत बुधवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
मुंबई- दापोली आंजर्ले ताडाचा कोंड वाडीतून जाणा-या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विधानसभेत बुधवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र या प्रश्नावर तेच तेच उत्तर ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर देत असल्याने सभागृहातील सदस्य संतापले होते. योग्य उत्तर येत नसल्याने हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी काही सदस्यांनी केली.
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील मौजे आंजर्ले येथील ताडाचा कोंड या वाडीतून जाणा-या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासंदर्भात तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संजय कदम यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केसरकर करत होते.
यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली असून यासाठी यंदा जिल्हा वार्षिक निधीत तरतूद करण्यात येईल. आंजर्ले गणपती मंदिर जोड रस्ता हा ग्रामीण मार्ग असल्याने या कामाचा समावेश करता येत नाही असेच उत्तर वारंवार सभागृहातील सदस्यांना देत होते.
त्यावर सदस्य प्रकाश आंबिटकर संतापले. बरेच सदस्य जिल्हा नियोजन समिती पैसे देत नाही. म्हणून तारांकित प्रश्नाद्वारे आपले प्रश्न मांडत असते. तरी देखील मंत्री योग्य उत्तरे देत नाहीत. हा एकप्रकारे सभागृहातील सदस्यांचा अवमान बसल्याचे आंबिटकर म्हणाले. शशिकांत शिंदे, अजित पवार यांनीही उपप्रश्न विचारून केसरकरांना कोंडीत पकडले. मात्र तेच तेच उत्तर देऊन केसरकरांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.