कल्याण-डोंबिवली महापालिकेत उपायुक्तांपासून ते शिपायांपर्यंत अधिकारी आणि कर्मचा-यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत.
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेत उपायुक्तांपासून ते शिपायांपर्यंत अधिकारी आणि कर्मचा-यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ पकडला गेल्याने शिवसेनेची पंचाईत होऊन बसली आहे. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी चार लाख रुपये स्वीकारत असताना तो ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात सापडल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
यानिमित्ताने केडीएमसीतील भ्रष्टाचाराची मालिका सुरूच असून सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्ट कारभारही चव्हाटय़ावर आला आहे. खुलेआम भ्रष्टाचार करूनही आपल्याला काहीच शिक्षा होत नाही, असा समज महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारीवर्गाचा झाल्याने बिनधास्त भ्रष्टाचार सुरू असल्याचे चित्र आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत जवळपास १९ अधिकारी-कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याचे आतापर्यंत उघड झाले आहे.
अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी ११ लाखांची मागणी केल्याप्रकरणी महापालिकेतील शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांच्यासह पालिकेतील उपअभियंता दत्तात्रय मस्तूद व शिपाई विकास कडू यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. काही दिवसांपूर्वीच अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी एका सराफाकडून तीन लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी केडीएमसीचा ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे व त्याचा खासगी वाहनचालक चांद पाशा शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाने रंगेहाथ अटक केली होती. मागील चार वर्षात केडीएमसीत भ्रष्टाचाराने कळस गाठला असून कधी नव्हे इतके अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकले आहेत. उपायुक्त सुरेश पवार यांना अडीच लाखांची लाच स्वीकारताना अटक झाली होती. मात्र सध्या पवार हे नामानिराळे असल्यागत उपायुक्तपदावरच काम करत असून त्यांच्याकडे अतिक्रमणविरोधी पथकाचा पदभार सोपवण्यात आला आहे.
कोण आहेत लाचखोर?
उपायुक्त सुरेश पवार, कार्यकारी अभियंता सुनील जोशी, प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, गणेश बोराडे, उपअभियंता जयवंत म्हात्रे, भालचंद्र नेमाडे, कनिष्ठ अभियंता बी. जी. काटकर, अन्न निरीक्षक मधुकर शिंदे आदी बडय़ा अधिका-यांसह प्रताप मोरे, वसंत सांगळे, नारायण परमार (सेवानिवृत्त), तुकाराम संख्ये, वसंत खाडे, नवनीत पाटील, प्रशांत नेर, मोहंमद अन्वर खान या अधिकारी व कर्मचारी लाचखोरीच्या जाळय़ात अडकले आहेत. मात्र महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेतील नगरसेवक लाचखोरीच्या जाळय़ात अडकण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते.