आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी जाहीर वादविवाद करणार नाही.
नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी जाहीर वादविवाद करणार नाही. त्यांच्याशी जाहीर वादविवादाचा कार्यक्रम तमाशा ठरेल आणि मी राजकारणात तमाशा करण्यासाठी आलेली नाही असे सांगत दिल्लीच्या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अरविंद केजरीवालांसोबत जाहीर वादविवाद करण्यास नकार दिला.
भाजपाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी यांचे नाव जाहीर होताच केजरीवालांनी बेदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. दिल्लीच्या विविध मुद्यांसदर्भात सर्वांसमक्ष जाहीर वादविवाद करण्याचे आव्हान त्यांनी बेदींना दिले.
बुधवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत बेदींना यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्या म्हणाल्या की, सर्वप्रथम अशा जाहीर वादविवादाच्या कार्यक्रमासाठी आता उशिर झाला आहे. दुर्देवाने केजरीवालांचा अशा वादविवादांवर विश्वास आहे. माझा चर्चेपेक्षा कृतीवर जास्त विश्वास आहे. विधानसभेच्या सभागृहात मला केजरीवालांसोबत वादविवाद करायला नक्कीच आवडेल. आता केजरीवालांसोबत जाहीर वादविवाद केला तर तो, तमाशा ठरेल आणि मी राजकारणात तमाशा करण्यासाठी आलेली नाही असे उत्तर त्यांनी दिले.