अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी आपली तयारी असल्याचे किरण बेदी यांनी सांगितले.
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी आपली तयारी असल्याचे भाजपात प्रवेश केलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांचे अफाट कार्य पाहून मी उत्साहीत आहे. त्यांच्या प्रेरणेनेच मी भाजपात जिंकण्यासाठी आले आहे. मला हरण्यासाठी भाजपाने स्विकारलेले नाही. मी २६ वर्षे सामाजिक संस्थेत काम केले आहे. त्यामुळे गरीबांचे प्रश्न, त्यांच्या समस्या काय आहेत, त्या मला चांगल्या माहीत आहेत. माझ्या ४० वर्षाच्या प्रशासकीय अनुभवाचा उपयोग मी नागरिकांसाठी आणि विशेषत: दिल्लीकरांच्या विकासासाठी करणार आहे. यासाठी पक्षाने ठरवले तर आपण केजरीवाल यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहोत. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे त्या म्हणाल्या.
किरण बेदी यांनी गुरुवारी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. केजरीवाल आणि बेदी या दोघांनीही अन्ना हजारे यांच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेत ‘टीम अण्णा’ त सहभागी झाले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी २०१२ मध्ये वेगळे होत आम आदमी पक्षाची स्थापना केली.