नवी दिल्ली येथील ‘आप’सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अरेरावी वाढत चालली असून त्यांनी सोमवारी दिल्लीच्या प्रधान सचिवाच्या कार्यालयालाच टाळे ठोकून आपल्या हुकुमशाही वृत्तीचे दर्शन घडवले.
नवी दिल्ली- नवी दिल्ली येथील ‘आप’सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अरेरावी वाढत चालली असून त्यांनी सोमवारी दिल्लीच्या प्रधान सचिवाच्या कार्यालयालाच टाळे ठोकून आपल्या हुकुमशाही वृत्तीचे दर्शन घडवले.
दिवसभरात नायब राज्यपाल व केजरीवाल यांच्या वादामुळे दिल्लीच्या प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. गॅम्लिन यांच्या नियुक्तीवरून नायब राज्यपाल नजीब जंग व मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, ‘आप’ सरकारने प्रधान सचिवपदी राजेंद्र कुमार यांची केलेली नियुक्ती नायब राज्यपाल जंग यांनी रद्द करून केजरीवाल यांना आपणच बॉस असल्याचे दाखवून दिले.
राज्याचे प्रधान सचिव (सेवा) अनिंदो मुझुमदार हे सकाळी आपल्या कार्यालयात पोहचले. त्यावेळी त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याचे आढळले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी वरिष्ठ नोकरशहा राजेंद्र कुमार यांची प्रधान सचिव (सेवा) पदावर तातडीने नियुक्ती केली.
मात्र, नायब राज्यपालांनी मुझुमदार यांचीच नियुक्ती वैध ठरवली. दिल्लीतील वरिष्ठ नोकरशहांच्या बदली करण्याचे अधिकार केवळ नायब राज्यपालांनाच आहेत, असे जंग यांनी केजरीवाल यांना पत्र पाठवून ठणकावले. हे पत्र माध्यमांपर्यंत पोहचल्याने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा तीळपापड झाला. घटनात्मक अधिकारावर असलेल्या व्यक्तीचे पत्र माध्यमांपर्यंत पोहचते हे आश्चर्य आहे. भारताच्या घटनेत हे बसते का? असा सवाल त्यांनी केला.
राज्याच्या मुख्य सचिवपदी शकुंतला गॅम्लिन यांची नियुक्ती केल्याचे परिपत्रक अनिंदो मुझुमदार काढले होते. त्याचा राग मनात ठेवून केजरीवाल यांनी मुझुमदार यांनाच त्या पदावरून हटवले.
मुख्य सचिवांनी घेतली गृह सचिवांची भेट
दरम्यान, दिल्लीच्या मुख्य सचिव शकुंतला गॅम्लिन यांनी केंद्रीय गृहसचिव एल. सी. गोयल यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी, गृह खात्याचे संयुक्त सचिव (केंद्रशासित प्रदेश) राकेश सिंग ही बैठकीला उपस्थित होते.
राष्ट्रपतींना आज केजरीवाल भेटणार
दिल्लीतील नोकरशहांच्या नियुक्तीवरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल हे मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी सायंकाळी ६ वाजताची भेट दिली आहे, असे केजरीवाल यांच्या कार्यालयाने सांगितले.