आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना ताप भरल्याने त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट रद्द केली आहे.
नवी दिल्ली– जनलोकपालसाठी सातत्याने उपोषणाला बसणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ‘टीम अण्णा’ आता फुटीच्या मार्गावर आहे. जनलोकपालसाठी अण्णा हजारे येथे उपोषणाला बसलेले असताना ‘आप’चे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत राळेगणसिद्धीमध्ये भेट घेण्यास आले नाहीत.
त्यांनी पक्षातील कुमार विश्वास आणि संजय सिंह यांना पाठवले. दरम्यान, अण्णांच्या या आंदोलनाला पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणा-या आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात अण्णा हजारे यांच्या समर्थकांमध्ये असंतोष खदखदत असल्याचे गुरुवारी राळेगणसिद्धी येथे दिसून आले.
जनलोकपालच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांना भेटायला आलेले ‘आप’चे नेते कुमार विश्वास यांना हजारे यांच्या समर्थकाने धक्काबुक्की केली. याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी हजारे १० डिसेंबरपासून राळेगणसिद्धीत उपोषणाला बसले आहेत. मात्र अनेक वरिष्ठ मंडळी या आंदोलनापासून दूर राहिल्याने याची फारशी हवा निर्माण झाली नाही. त्यातही दिल्ली विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणारे ‘आप’चे नेते अरिवद केजरीवाल अण्णांच्या भेटीला न आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.