दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधानंतरही शकुंतला गॅम्लिन यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेतला आहे.
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधानंतरही शकुंतला गॅम्लिन यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेतला आहे.
मुख्य राज्यपालपदी गॅम्लिन यांची निवड झाल्यानंतर केजरीवाल यांनी गॅम्लिन यांना सचिवपदाचा कार्यभार हाती घेऊ नये असे म्हटले होते. मात्र त्यानंतरही गॅम्लिन यांनी या पदाचा कार्यभार हाती घेतल्याने दिल्ली सरकार आणि राज्यपाल याच्यांतील वादाने नवे वळण घेतले आहे.
गॅम्लिन यांची नियुक्ती नियमांच्या विरुद्ध असल्याने त्यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारु नये असे केजरीवाल यांनी गॅम्लिन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गुरुवारी मुख्य सचिवपदी गॅम्लिन यांनी निवड केली होती. त्यानंतर काही तासांतच गॅम्लिन यांनी जंग यांना पत्र लिहून सचिवपदाचा कार्यभार हाती घेऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता.
नायब राज्यपाल यांच्या गॅम्लिन यांच्या नियुक्तीच्या निर्णयानंतर दिल्ली सरकारने जोरदार टीका केली होती. राज्यपाल निवडून आलेल्या सरकारला आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बायपास करू शकत नसल्याचे ‘आप’ने म्हटले होते.
मात्र राज्यपाल जंग यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. भारतीय राज्यघटनेतील कलम २३९ अअनुसार नायब राज्यपाल हा दिल्ली प्राधिकरणाचा प्रतिनिधी असल्याचे म्हटले होते.