‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे एकूण २.०९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याकडे ११.६५ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी संपत्तीही जाहीर केली.
‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याकडे एकूण २.०९ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याकडे ११.६५ कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्याकडे २.२६ लाख रुपयांची अस्थायी मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १५.२८ लाख रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये नऊ लाख रुपयांचे सोने आणि २४ हजार रुपयांची २४ ग्रॅम चांदी यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांनी आपल्याकडे २.१४ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४ मध्ये केजरीवाल यांचे वार्षिक उत्पन्न २.०७ लाख इतके होते तर त्यांच्या पत्नीचे ११.८३ इतके होते.
तर बेदी यांनी एकूण ११.६५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. बेदींकडे तीन कोटी १४ लाख ६७७ रुपयांची अस्थायी मालमत्ता आहे तर २५ हजार रुपयांचे सोने आहे. त्यांच्या पतींकडे एकूण ३२ लाख ८५ हजार ५२८ रुपयांची संपत्ती आहे. ६.०५ कोटी रुपयांचे दिल्लीत द्वारका आणि उदयपार्क तर उत्तर प्रदेशमध्ये गौतमबुद्ध नगर येथे सदनिका आहे. त्यांच्याकडे मारुती ८०० ही कार आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, २०१३-१४ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न ६७ लाख १५ हजार ४६४ इतके होते.