ब्रेन स्ट्रोक (पक्षाघात) झाल्याने मेंदूत रक्ताची गुठळी किंवा रक्तस्रव झाल्यामुळे शरीरावर परिणाम होऊन यात रुग्णाचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते.
मुंबई- ब्रेन स्ट्रोक (पक्षाघात) झाल्याने मेंदूत रक्ताची गुठळी किंवा रक्तस्रव झाल्यामुळे शरीरावर परिणाम होऊन यात रुग्णाचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते. मात्र, वेळेवर उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.
पक्षाघात झालेल्या रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, याकरिता पालिकेच्या केईएम रुग्णालयापाठोपाठ आता शीव रुग्णालयातही ‘ब्रेन स्ट्रोक’ हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. तर नायर रुग्णालयात संबंधित विभागाचे काम प्रगतीपथावर असून येत्या १ जानेवारीपासून हा विभाग सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.
वैद्यकीय उपचारांअभावी मुंबईत मेंदूच्या विकारांचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. पाच महिलांमागे एक महिला व पाच पुरुषांमागे एक पुरुष पक्षाघाताचा बळी ठरतो. त्यामुळे रुग्णालयात पक्षाघाताच्या रुग्णांवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी केईएमनंतर शीव रुग्णालयात पक्षाघातासाठी विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागांतर्गत रुग्णाचे सिटी स्कॅन करणे, मेंदूत रक्ताची गुठळी असल्यास इंजेक्शन दिले जाते.
या इंजेक्शनची किंमत ३९ हजार रुपये इतकी आहे. यामुळे रुग्ण पटकन बरा होतो. मात्र, मेंदूत रक्तस्रव झाल्यास हे इंजेक्शन देता येत नाही. त्यासाठी शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. दरम्यान, या ब्रेन स्ट्रोक युनिटसाठी औषध विभाग, मेंदूविकार व क्ष-किरण अशा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम हे काम करत आहे.
केईएम रुग्णालयात दिवसाला तीन-चार रुग्ण उपचारांसाठी येतात हे लक्षात घेऊन प्रथम या रुग्णालयात हे युनिट सुरू करण्यात आले होते. या विभागात संबंधित रुग्णांसाठी दहा खाटा आरक्षित ठेवल्या आहेत. आता शीव रुग्णालयातही ‘ब्रेन स्ट्रोक युनिट’ सुरू करण्यात आले आहे. पक्षाघाताच्या रुग्णावर त्वरित उपचार व्हावेत याकरिता बाह्यरुग्ण विभाग कामाला लागला आहे.
शिवाय, रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्याला अतिदक्षता विभागात हलवले जाते. दरम्यान, नायर रुग्णालयातही १ जानेवारीपासून हा विभाग सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे वैद्यकीय शिक्षण व प्रमुख पालिका रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी म्हटले आहे.