केईएम रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाचे संपूर्णपणे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
मुंबई- केईएम रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाचे संपूर्णपणे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आधुनिक स्प्लिट लॅम्प मशिन, बिनटाक्याची ऑपरेशन करणारी फेको मशिन, डोळ्यांचा कार्डिओग्राम काढणारी अत्याधुनिक यंत्रणा यांसह चार नवीन ऑपरेशन थिएटर व रुग्णांवरील मानसिक ताण कमी करणारी म्युझिक सिस्टीम अशा सुविधा असलेला हा विभाग खासगी रुग्णालयांपेक्षा अधिक सज्ज असून नेत्ररोग रुग्णांवर वेळीच व योग्य उपचार मिळणार आहेत.
खासगी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांवरील उपचार प्रचंड महागडे आहे. पण केईएममध्ये संपूर्ण उपचार मोफत असल्याने या विभागात प्रचंड गर्दी असते. इमर्जन्सी मेडिकल सíव्हस विभागाच्या जवळच तळमजल्यावर हा नवीन विभाग सुरू झाला आहे. या विभागाचे संपूर्णपणे आधुनिकीकरण केले आहे. नवीन आणलेल्या स्प्लिट लॅम्प मशिनद्वारे काचिबदूचे तत्काळ निदान होते. डोळे तपासताना डोळ्याची प्रतिमा यातून चाळीस पट मोठी दिसते. हल्ली बिनटाक्याच्या ऑपरेशनला प्राधान्य दिले जाते. फेको मशिनवर ही ऑपरेशन होतात. सध्या या विभागात दोन फेको मशिन्स आहेत. त्यात आणखीन एका मशिनची भर पडली आहे. त्यामुळे ऑपरेशनची संख्या वाढेल. डोळ्यांचा कार्डिओग्राम काढणारी ३५ लाख रुपयांची आधुनिक ओसीटी मशिन आली आहे.
सध्या ऑर्थोपेडिक विभागाच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात या विभागाचे ऑपरेशन थिएटर (ओटी) आहे. यामध्ये दोनच ओटी असल्याने डोळ्यांची पंधरा ते वीस ऑपरेशन होतात. पण नवीन जागेत चार ऑपरेशन थिएटर तयार झाली आहेत. येत्या काही दिवसांत नवीन ओटी सुरू होतील. यामुळे दररोज सरासरी पंचवीस ते तीस ऑपरेशन होतील, असे नेत्ररोग विभागाच्या अधिका-याने सांगितले.