जादा नफा मिळवण्यासाठी आंबा व्यापारी कच्च्या कै-यांवर घातक असलेल्या कार्बाइड कॅल्शियम गॅसचा मारा करून त्या पिकवत आहेत.
मुंबई- पिवळसर आंबे पाहून ग्राहक हापूस समजून त्यासाठी वाटेल ती किंमत मोजतात. मात्र, ग्राहकांनो आता सावधान! जादा नफा मिळवण्यासाठी आंबा व्यापारी कच्च्या कै-यांवर घातक असलेल्या कार्बाइड कॅल्शियम गॅसचा मारा करून त्या पिकवत आहेत. अशाच एका टोळीचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून ३३ हजार रुपये किमतीचे आंबे जप्त केले आहेत. या आंब्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल लवकरच प्रशासनाला सादर केला जाणार आहे.
साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईतील मंडयांमध्ये आंबा विक्रीसाठी येतो. दीड हजार रुपये प्रति डझन या दराने त्याची विक्री केली जाते. परंतु झटपट आंबे पिकवून जादा नफा कमवण्यासाठी काही आंबा व्यापारी, विक्रेते कच्च्या कै-यांवर कार्बाइड कॅल्शियम गॅसचा मारा करून त्या पिकवतात. मात्र, अशा पद्धतीने पिकवलेला आंबा शरीराला अपायकारक असतो. त्यामुळे कृत्रिमरीत्या आंबा पिकवू नये, असे आवाहन यंदा अन्न व औषध प्रशासनाने आंबे विक्रेत्यांना एका बैठकीत केले होते. तसेच शहरातील विविध मंडयांमधील हमालांच्या मदतीने असे प्रकार कुठे घडत असल्यास त्याची माहितीही देण्याची विनंती केली होती.
भायखळा येथील मंडईमध्ये कार्बाइड कॅल्शियम गॅसचा मारा करून आंबे पिकवले जात असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासनाने तेथे नुकताच छापा टाकला होता. या कारवाईत सुमारे ३३ हजार रुपये किमतीचे आंबे जप्त केले असून, ते तपासणीसाठी प्रशासनाच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल लवकरच प्रशासनाला सादर केला जाणार आहे. यात दोषी आढळणा-यांना पाच लाख रुपयांचा दंड आणि ३ वर्षाच्या कारवासाची शिक्षा होऊ शकते, असे माहीतगारांनी सांगितले.
आंबा विक्रेते, व्यापारी कृत्रिमरीत्या आंबे पिकवत असतील, तर त्याची माहिती नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाला दयावी. जेणेकरून कारवाई करणे शक्य होईल. कच्च्या कै-यांवर कार्बाइड कॅल्शियम गॅसचा करून आंबा पिकवला जातो. यामुळे शरीराला बाधा होण्याची शक्यता असते. – सुरेश देशमुख, सहआयुक्त (अन्न)
आंबा पिकवण्यासाठी वापरल्या जाणा-या कार्बाइड गॅसच्या वापरावर परदेशात बंदी आहे. मात्र भारतात सर्रासपणे त्याची विक्री होते. त्यामुळे शरीराला बाधा होण्याची शक्यता असते. अर्सेनिक धातूमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. – डॉ. रविकांत सिंग, अध्यक्ष, ‘डॉक्टर्स फॉर यू’