कुर्ली-घोणसरी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा पर्यटनदृष्टय़ा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कणकवली – कुर्ली-घोणसरी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा पर्यटनदृष्टय़ा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण सिंचन पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी ग्रामस्थांबरोबर केलेल्या चर्चेत या प्रकल्पाच्या परिसरात सुसज्ज विश्रामगृह, उद्यान निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठी नवीन मूल्यांकन करून सरकारकडे पाठवून खास निधीची तरतूद करण्यासंदर्भात ते पाठपुरावा करणार आहेत.
कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान त्यांनी कुर्ली – घोणसरी देवघर पाटबंधारे प्रकल्पाचीही पाहणी केली. या प्रकल्पाची वाढीव बांधणी करून सिंचन क्षमता आणखी वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा करून पाटबंधारे विभागाचे जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामंडळाच्या अधिकारांतर्गत आणि पर्यटन सुविधा विषयांतर्गत कुर्ली – घोणसरी प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या जागेत सुसज्ज विश्रामगृह उभे करणे, उद्यानाची निर्मिती करून पर्यटकांना विरंगुळा आणि निवास अशा सुविधा निर्माण करून देण्याचे आश्वासन या वेळी संदेश पारकर यांनी दिले.
डावा आणि उजवा कालवा या धरणापासून सुरू होतात. त्यातील वैभववाडीकडे जाणारा कालवा बहुतांश पूर्ण झाला आहे. मात्र, फोंडय़ाकडे येणा-या कालव्याचे काम प्रलंबित आहे. भूसंपादनाचा प्रश्न, जमीन मालकांची संमत्ती या गोष्टींचा विचार करता जमिनीतून भुयारी पद्धतीने कालवा तयार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या मागणीचा विचार करताना नव्याने अंदाजपत्रक तयार करून तसा सर्वे केला जाईल व सरकारी मान्यता घेऊन भुयारी पद्धतीने कालवा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही संदेश पारकर यांनी सांगितले. जनतेच्या मागणीचा आदर आपण सातत्याने करणार आहोत. त्यांच्या अपेक्षांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू, असेही ते या वेळी म्हणाले.