कुमार विश्वास यांच्यावर अनैतिक संबंधांचा गंभीर आरोप करुन एका महिलेने पुन्हा एकदा आपच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाला सध्या एकामागोमाग एक धक्के बसत असून पक्षांतर्गत बंडखोरीतून पक्ष सावरत असतानाच आता पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यावर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
कुमार विश्वास यांच्यावर अनतिक संबंधांचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ‘आप’च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या महिलेने केलेल्या तक्रारीवरून दिल्लीच्या राज्य महिला आयोगाने कुमार विश्वास यांना मंगळवारी हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे. या महिलेने दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनाही आपल्या तक्रारीचे पत्र पाठवले आहे. ही महिला अमेठी येथे कुमार विश्वास यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या संपर्कात आली होती.
तर कुमार विश्वास यांनी मात्र आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून ‘आप’नेही या प्रकरणात कुमार विश्वास यांची बाजू घेत महिला आयोगाकडून कुमार विश्वास यांना कुठलेही समन्स मिळाले नसल्याचे म्हटले आहे. शिवाय हे भाजपाचे कारस्थान असून भाजपाने असे घाणेरडे राजकारण थांबवावे असेही ‘आप’ने म्हटले आहे. ‘माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपा माझ्याबद्दल खोटी मोहीम चालवत आहे’, असे कुमार विश्वास म्हणाले आहेत.
अमेठीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी पिडीत महिला कुमार विश्वास यांच्या संपर्कात आली होती. कुमार विश्वास यांनी अमेठीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती.