चार दिवसांपूर्वी भाजपामध्ये दाखल झालेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे नाव भाजपाने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले आहे.
नवी दिल्ली – चार दिवसांपूर्वी भाजपामध्ये दाखल झालेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे नाव भाजपाने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले आहे.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी रात्री पत्रकारपरिषद घेऊन ही घोषणा केली. दिल्लीच्या कृष्णानगर मतदारसंघातून त्या विधानसभेची निवडणूक लढवतील अशी माहितीही शहा यांनी दिली.
बेदी भाजपामध्ये दाखल झाल्यापासून त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असल्याने दिल्ली भाजपामधील वरिष्ठ नेत्यांमध्ये असंतोष होता. आता बेदी यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर झाल्याने दिल्ली भाजपामधील अनेक वरिष्ठ नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
बेदी यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. दिल्ली विधानसभेची निवडणूक बेदी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय एकमताने झाल्याचा दावा शहा यांनी केला. भाजपामध्ये अंतर्गत नाराजी नसून, हे प्रसारमाध्यमांचे तर्क-विर्तक आहेत असे शहा म्हणाले.
आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी भाजपाला दिल्लीमध्ये स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांची आवश्यकता होती. त्यामुळे भाजपाने किरण बेदी यांना संधी दिली आहे.