आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वंतत्र तेलंगण राज्याला मान्यता देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने किरणकुमार रेड्डी यांनी बुधवारी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
हैदराबाद – आंध्रप्रदेशचे विभाजन करुन स्वंतत्र तेलंगण राज्याला मान्यता देणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याने किरणकुमार रेड्डी यांनी बुधवारी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यापुढे आपण आंध्रप्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करु, असे रेड्डी यांनी सांगितले.
स्वतंत्र तेलंगण राज्याला मान्यता देणारे विधेयक मंजूर झाल्यास आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ असे किरणकुमार रेड्डी यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला.
तेलंगण विधेयक लोकशाही पध्दतीने मंजूर झालेले नसल्याने, या विधेयकाला कायदेशीर आव्हान देण्याचा त्याचा विचार असल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.
आंध्रप्रदेशच्या विभाजनावरुन असलेला असंतोष शांत होईपर्यंत सक्रीय राजकरणापासून काहीकाळ बाजूला रहाण्याचाही त्यांचा मानस आहे असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. आज होणा-या पत्रकारपरिषदेत त्यांच्या भविष्यातील योजना स्पष्ट होऊ शकतात. या विधेयकामुळे देशात २९ वे तेलंगण राज्य अस्तित्वात आले आहे.