किंगफिशर एअरलाईन्स या विजय मल्ल्याच्या विमान सेवेचा ब्रँड आणि ट्रेडमार्कचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र खरेदी करण्यासाठी एकही जण फिरकला नसल्याने या लिलावाचा फियास्को झाला.
मुंबई- किंगफिशर एअरलाईन्स या विजय मल्ल्याच्या विमान सेवेचा ब्रँड आणि ट्रेडमार्कचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. मात्र खरेदी करण्यासाठी एकही जण फिरकला नसल्याने या लिलावाचा फियास्को झाला.
या मालमत्तेची किंमत ३६६ कोटी ७० लाख रुपये ठरवली होती. मल्ल्या याच्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांचा हा प्रयत्नही वाया गेला. मल्ल्याने देशातील १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपये कर्ज बुडवले असून तो इंग्लंडमध्ये पळून गेला आहे. याआधीही मल्ल्याचे किंगफिशर हाऊसचा लिलाव आयोजित केला होता. त्यावेळीही कुणी खरेदीदार आला नाही.
ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव झाला होता. किंगफिशरचा लोगो तसेच फ्लाय द गुड टाईम्स ही प्रसिद्ध कॅचलाईन लिलावासाठी होती. तसेच फ्लाईंग मॉडेल्स, फनलाईनर, फ्लाय किंगफिशर आणि फ्लाईंग बर्ड डिव्हाईस हे ट्रेडमार्क लिलावासाठी उतरवले होते.
या लिलावासाठी राखीव किंमत ३६६ कोटी ७०लाख ठेवली होती. मात्र ही किंमत खूप जास्त असल्याने एकही खरेदीदार आला नसावा, असे सूत्रांनी सांगितले. राखीव किंमत खूपच जास्त असल्याने बोली लावण्यात आली नाही. अर्थात जेव्हा कर्ज घेतले तेव्हा या ट्रेडमार्कचे मूल्यांकन किती तरी पटींनी जास्त होते. ११.३० वा. लिलाव सुरू झाला आणि एक तासाने कोणत्याही बोलीशिवायच बंद करण्यात आला. एका ज्येष्ठ बँकरच्या मते तयार ब्रँड घेण्याऐवजी नवी विमान कंपनी सुरू करणे जास्त चांगले आहे.