आर्थिक अडचणीत सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचा उड्डाणाचा परवाना अखेर रद्द झाला आहे.
मुंबई- प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत नागरी हवाई महासंचालनालयाकडून (डीजीसीए) ऑक्टोबरमध्ये परवाना निलंबनाची कारवाई झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सवर अखेर परवाना गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. परवाना नूतनीकरणाची मुदत संपल्याने तसेच कंपनी ठोस उपाययोजना सादर न करू शकल्याने हा निर्णय घेतल्याचे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. परवाना नूतनीकरणाची ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती. या कारवाईमुळे कंपनीच्या कर्मचा-यांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार आहे.
सेवाकरांची थकबाकी, कर्मचा-यांचे थकित वेतन आणि डोईजड झालेले कर्ज यामुळे कंपनीने दिवाळखोरीचीच वाट धरली होती. गेल्या आठ महिन्यांपासूनचे थकित वेतनाच्या मागणीसाठी कर्मचा-यांच्या संपाला वारंवार सामोरे जावे लागले. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) कंपनीवर ऑक्टोबरमध्ये परवाना निलंबनाची कारवाई केली होती. तसेच सुधारित आर्थिक आराखडा सादर करण्याचे बजावले होते. गेल्या महिन्यात कंपनीने हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे परवानाच्या नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच कंपनीकडून गेल्याच आठवड्यात परवान्यावरील निर्बंध उठवण्यासाठी सुधारित व्यावसायिक आराखडाही सादर करण्यात आला होता. तर ‘डीजीसीए’कडूनही कंपनीकडून आर्थिक निधी कसा उभारणार, याची माहिती मागवण्यात आली होती. मात्र कंपनीच्या परवाना नूतनीकरणावर निर्णय होऊ न शकल्याने अखेर कंपनीवर परवाना रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. किंगफिशरचा हवाई परवाना रद्द करण्यात येत असल्याचे डीजीसीएचे प्रमुख अरुण मिश्रा यांनी म्हटले आहे. मात्र गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या व्यावसायिक आराखड्यातील आर्थिक तरतुदीबाबत त्यांनी माहिती देण्याचे टाळले.
परवाना रद्द झालेल्या किंगफिशरने मात्र अधिक काळजीचे कारण नाही. नियमानुसार मुदत संपल्यानंतर दोन वर्षामध्ये परवाना नूतनीकरण करता येत असल्याचे म्हटले आहे.
कंपनीची सेवा सुरू करण्याच्या योजनेला, परवान्याबाबत डीजीसीएची लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले होते. तर डिजीसीएकडून मंगळवारी कंपनीला एअरक्राफ्ट मेंटेनन्ससाठी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत परवाना मिळाला आहे.
एअर डेक्कनच्याच मार्गावर
बरोब्बर नऊ वर्षापूर्वी एअर डेक्कनचा हवाई वाहतूक परवाना विजय मल्ल्या यांनी खरेदी केला होता. कॅप्टन गोपीनाथ यांनी दिवाळखोरीत निघालेल्या एअर डेक्कनचा परवाना मल्ल्या यांना दिला. २६ ऑगस्ट २००३ मध्ये किंगफिशरच्या नावे हा परवाना झाला. मात्र गेल्या नऊ वर्षात एकदाही नफा न झालेल्या कंपनीची आर्थिक स्थिती बिकट झाली. कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढला असून दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
[EPSB]
किंगफिशरला ७५४ कोटींचा तोटा
किंगफिशर एअरलाईन्सला सप्टेंबरच्या दुस-या तिमाहीत ७५४ कोटींचे नुकसान झाले आहे.
[/EPSB]