वेगवेगळय़ा कारणांमुळे मी आनंद आणि कार्लसनच्या संपर्कात आलो आहे. बुद्धिबळ कारकीर्दीच्या माझ्या दुस-या टप्प्याचे ‘कारपॉव’ आणि ‘पोस्ट कारपॉव’ असे विभाजन करायचे म्हटले आनंद माझा सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी राहिला आहे.
‘‘येत्या शनिवारी-रविवारी मी भारतात येत आहे. गोव्यात होणा-या ‘थिंक’ परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर मी चेन्नईला भेट देईन. त्यामुळे आनंद आणि कार्लसनच्या पहिल्या डावावेळी मी तिथे नसेन. मात्र तिस-या किंवा चौथ्या डावावेळी उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न आहे,’’असे कास्पारॉव यांनी सांगितले. आनंद आणि कार्लसन या दोन्ही बुद्धिबळपटूंशी आपला चांगलाच परिचय असल्याचे त्यांनी म्हटले.
‘‘वेगवेगळय़ा कारणांमुळे मी आनंद आणि कार्लसनच्या संपर्कात आलो आहे. बुद्धिबळ कारकीर्दीच्या माझ्या दुस-या टप्प्याचे ‘कारपॉव’ आणि ‘पोस्ट कारपॉव’ असे विभाजन करायचे म्हटले आनंद माझा सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी राहिला आहे. अखेरच्या टप्प्यात ‘ग्रेट’ अनातोली कारपॉवचा दबदबा राहिला नव्हता. त्याच वेळी लिनारेससारख्या स्पर्धातून नव्या पिढीतले आनंद, इवानचुक आणि क्रॅमनिकसारखे गुणवान बुद्धिबळपटू पुढे येत होते,’’असे आनंदने सांगितले.
कास्पारॉव यांनी १९९५ मधील जगज्जेतेपदाच्या लढतीच्या आठवणीला यावेळी उजाळा दिला. ‘‘एकामागून एक स्पर्धा जिंकणारा आनंद १९९५ मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत माझ्यासमोर उभा ठाकला. न्यूयॉर्क सिटीत त्यावेळी आनंद पराभूत झाला तरी हा बुद्धिबळपटू पुढील अनेक वर्षे जागतिक बुद्धिबळावर वर्चस्व गाजवेल, हे सर्वाना कळून चुकले. २००५ मध्ये निवृत्त झाल्यावर मी अनुभवले. तेच आनंदबाबत घडतेय. सध्या अनुभवी असला तरी हा ‘सिनियर’ कार्लसनसारख्या युवा बुद्धिबळपटूंशी दोन हात करतोय. मला आनंदचा अपमान करायचा नाही. मात्र जगज्जेता असूनही ४३ वर्षीय आनंदपेक्षा त्याचा २२ वर्षीय प्रतिस्पर्धी कार्लसनच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे यावेळच्या जगज्जेतेपदाच्या लढतीला असाधारण महत्त्व आले आहे,’’ असे कास्पारॉव म्हणाले.
अल्पावधीत अव्वल स्थानी झेप घेणा-या कार्लसनचे कास्पारॉव यांनी कौतुक केले आहे. ‘‘दैवी देणगी लाभलेले अनेक युवा बुद्धिबळपटू सध्या अप्रतिम कामगिरी करताहेत. कार्लसन त्यापैकीच एक आहे. आनंदच्या तुलनेत अनुनभवी असूनही अत्यंत गुणी कार्लसन यावेळी जेतेपदासाठी ‘फेवरिट’ वाटतो. गेल्या काही वर्षात अफलातून खेळ करत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
कार्लसनचा विजय हा नव्या पिढीसाठी (तसेच स्पॉन्सर्ससाठी) प्रेरणादायी ठरू शकेल. त्यातच आपल्याला इतिहासाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आनंदपेक्षा कार्लसनचे वय निम्मे आहे. कार्लसनचा जोश आणि लढाऊ वृत्ती पाहता आनंदसमोर त्याने मोठे आव्हान उभे केले आहे. मात्र कार्लसन सहज बाजी मारेल, असेही म्हणता येणार नाही. अव्वल मानांकन आणि सातत्य पाहता कार्लसनचे पारडे थोडे जड वाटत असले तरी आनंदकडे प्रत्येक स्तरावरील खूप अनुभव आहे. प्रत्यक्ष सरावाचा मानसिक फायदा त्याला होईल. जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी आनंदने खूप मेहनत घेतली आहे,’’असे कास्पारॉव यांनी सांगितले.
मायदेशात खेळल्याचा फायदा आनंदला होईल, असे त्यांना वाटते. ‘‘आनंदने भारतासह जागतिक बुद्धिबळाला मोठी उंची गाठून दिली आहे. जगज्जेतेदाची लढत मायदेशात खेळल्याचा फायदा त्याला होईल. घरच्या पाठिराख्यांसमोर खेळताना दडपणही येऊ शकते. मात्र त्याची कामगिरी खाल्यावण्याऐवजी हे दडपण कामगिरी उंचावण्यासाठी प्रेरकही ठरू शकते,’’असे कास्पारॉव यांनी म्हटले.
(कास्पॉरोव हे १३वे जगज्जेते आहेत. २००५ मध्ये निवृत्त होईपर्यंत तब्बल २० वर्षे ते अव्वल स्थानी होते.)
उद्घाटन सोहळा आज
चेन्नई – जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात शनिवारपासून होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीचा उद्घाटन समारंभ गुरुवारी (७ नोव्हेंबर) होत आहे. सायंकाळी चार वाजता हयात रिजन्सीत हा समारंभ होईल. त्या दरम्यान आनंद आणि कार्लसनची पत्रकार परिषद अपेक्षित आहे. या सोहळय़ाला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रमुख उपस्थिती असेल. जगज्जेता विश्वनाथन आनंद आणि अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात होणा-या बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीत माजी जगज्जेते रशियाचे गॅरी कास्पारॉव यांनी कार्लसनला ‘फेवरिट’ मानले आहे.