जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिस-या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे.
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांसह १४४ उमेदवारांचे भवितव्य उद्या निश्चित होणार आहेत.
बडगाव, फुलवामाआणि बारामुल्ला जिल्ह्यातील १६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शुक्रवारी काश्मीर खो-यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राजवळ कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शुक्रवारी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे ११ जवान शहीद झाले तर आठ दहशतवादी ठार झाले होते.
काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या उरी आणि त्राल मतदारसंघात उद्या होणा-या मतदानाकडे सर्वांचे अधिक लक्ष असणार आहे. पहिल्या दोन्ही टप्प्यात काश्मीरमध्ये भरघोस मतदान झाले. या दोन्ही टप्प्यात ७० टक्क्याहून अधिक मतदानाची नोंद झाली.
या निवडणुकीत सुमारे १४४ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि दहा आमदारांचा यामध्ये समावेश आहे. उद्या होणा-या मतदानात १३.६९ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ६.५१ लाख महिला मतदार आहेत. या भागात एक हजार ७८१ मतदान केंद्रे आहेत.