जगज्जेतेपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध निभाव लागला नाही, अशी कबुली पराभूत झालेला माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदने दिली.
नवी दिल्ली- जगज्जेतेपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध निभाव लागला नाही, अशी कबुली पराभूत झालेला माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदने दिली.
‘‘कार्लसनविरुद्ध मी केलेले नियोजन पूर्णपणे फसले. तो टाकत असलेल्या दडपणाला मी यशस्वीपणे सामोरा जाऊ शकलो नाही. याउलट कार्लसनने त्याला जे पाहिजे ते सर्व काही मिळवले. जगज्जेतेपदाचा तोच सर्वार्थाने दावेदार होता याबाबत काहीच साशंकता नको. कार्लसन हा एक आगळावेगळा प्रतिस्पर्धी आहे. त्याला कसे रोखायचे हेच मला कळत नव्हते. त्यातच माझ्या काही खेळातील कमकुवत बाबीही पराभवाच्या कारण ठरल्या. इतक्या सहज पराभव होईल असे वाटले नव्हते. कार्लसन हा एखाद्या कंटाळवाण्या वाटत असलेल्या डावातही रंगत आणू शकतो. त्याने माझ्याविरुद्ध तेच केले,’’ असे आनंदने मान्य केले.
जेतेपद राखू न शकल्याचा अजूनही खेद वाटत असल्याचे तो म्हणतो. ‘‘अजूनही जेतेपद राखू शकलो नाही याचे शल्य जाणवत आहे. मात्र घरी परतल्यानंतर जेव्हा माझा मुलगा अखिलसोबत खेळलो तेव्हा कुठे सावरलो. सध्या पहिल्यापेक्षा बरं वाटत आहे,’’ असे आनंदने म्हटले.
जगज्जेतेपदाच्या लढतीत आनंद प्रमाणापेक्षा जास्त बचावात्मक खेळल्याची टीका झाली. आनंदने ही बाब मान्य केली. ‘‘मला नेहमीच आक्रमक खेळायला आवडते आणि शक्य तेव्हा बरोबरी साधण्याचा प्रयत्न असतो. मात्र कार्लसनला बरोबरी मान्य करायला कशी लावायची हेच कळत नव्हते. सर्व शक्यता उधळून लावणे हाच कार्लसनमधील गुण आहे. जेव्हा तुम्ही त्याला एका सापळ्यात अडकवता त्यावेळी कार्लसन तुमच्यासाठी वेगळाच सापळा रचतो. त्याचे हे कसब मला जगज्जेतेपदाच्या लढतीपूर्वीच माहिती होते. मात्र मी आशा सोडली नव्हती,’’ असे आनंदने सांगितले.
कार्लसन हा त्याच्या पिढीचा राजा असल्याचे आनंद मान्य करतो. ‘‘जगज्जेतेपद पटकवल्यानंतर कार्लसन हा त्याच्या पिढीचा राजा आहे हे दिसले. कार्लसन इरा असे कदाचित संबोधले जाऊ शकते. आमच्या दोघांचाही खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न आहे. त्यामध्ये वयाची तुलना मात्र करता येणार नाही,’’ असे आनंदने स्पष्ट केले.
सध्या निवृत्तीचा विचार नसल्याचेही तो म्हणतो. ‘‘जगज्जेतेपद हरणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का आहे. मात्र त्याचा चुकीचा अर्थ (आनंद निवृत्त होणार असल्याची चर्चा) काढता येणार नाही. कारण अजूनही मला कारकिर्दीत काही यशस्वी टप्पे गाठण्यासारखे आहेत. ते पाहता सध्या मी निवृत्त होणे शक्य नाही. आता खेळाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मी थोडाफार बदल करणार आहे. आता यशस्वी पुनरागमन करायला कदाचित वेळ लागेल मात्र ते निश्चितपणे होईल. आता मी सहाव्यांदा जगज्जेतेपद जिंकू शकेन की नाही ही चर्चा होत असली तरी सध्या मी या आठवड्यापासून सुरू होणा-या लंडन क्लासिक स्पर्धेचा विचार करत आहे.
सहावे जगज्जेतेपद पटकवण्याच्या रेसमध्ये उतरण्यासाठी मला मार्चमध्ये होणारी कॅँडिडेट्स स्पर्धा जिंकावी लागेल. मात्र एकावेळी एकाच स्पर्धेचा मी विचार करणार. त्यातच नुकतीच जगज्जेतेपदाची लढत संपल्याने त्या थकव्यातून मी बाहेर आलो आहे. गेली काही वर्षे मला सातत्याने जगज्जेतेपदाच्या लढती खेळाव्या लागल्या आहेत. ते पाहता मी विश्रांतीलाही तितकेच प्राधान्य देतो, असा विश्वास आनंदने व्यक्त केला.