मॅग्नस कार्लसनने आठ सामन्यांतून १८ गुणांसह चौथ्यांदा लंडन बुद्धिबळ क्लासिक ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.
लंडन- भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आणि अव्वल मानांकित नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यातील लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेची नववी आणि शेवटची लढत बरोबरी संपली. मात्र २२ वर्षीय कार्लसनने आठ सामन्यांतून १८ गुणांसह (पाच विजय) चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच त्याने रशियाचे माजी दिग्गज बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पारोव यांचा १३ वर्षापूर्वीचा असलेला २८५१ रेटिंगचा विक्रम मोडित काढला. कार्लसनचे आता २८६२.४ रेटिंग आहे.
आनंद आणि कार्लसन यांच्यातील लढत तब्बल ६१ चालींपर्यंत रंगली. मात्र विजयी चाल खेळण्यात दोघांनाही अपयश येत असल्याने बरोबरी मान्य करण्यात आली. याबरोबरच स्पर्धेत एकमेव विजय नोंदवता आलेला आनंद नऊ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला.
रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला (१६ गुण) इंग्लंडच्या मायकेल अॅडम्सविरुद्ध (१३ गुण) ३८ चालींनंतर बरोबरीत समाधान मानावे लागले. क्रॅमनिकने दुसरे स्थान राखले. अॅडम्स संयुक्तपणे तिस-या स्थानी राहिला.
स्पर्धेत सहभागी एकमेव महिला बुद्धिबळ हंगेरीच्या ज्युडिथ पोल्गरनेही अर्मेनियाच्या लेवॉन अरोनियनविरुद्ध ३४ चालींमध्ये बरोबरी स्वीकारली. पोल्गर सहा गुणांसह सातव्या आणि अरोनियन आठ गुणांसह सहाव्या स्थानी राहिले.
अमेरिकेच्या हिकरू नाकामुराने इंग्लंडच्या ल्यूक मॅक्शेनला ३३ चालींमध्ये नमवले. याबरोबरच नाकामुराने १३ गुणांसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकवले. मॅक्शेनला मात्र पाच गुणांसह आठव्या स्थानी समाधान मानावे लागले.