ठाणे महानगरपालिका व पोलीस यंत्रणा या सामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत असतात. मात्र,ठाणे महापालिका व कासारवडवली पोलिसांनी कर्तव्यात कसूर करून बघ्यावरच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून उफराटा न्याय करण्याचा प्रकार घडलेला आहे.
ठाणे- ठाणे महानगरपालिका व पोलीस यंत्रणा या सामान्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत असतात. मात्र,ठाणे महापालिका व कासारवडवली पोलिसांनी कर्तव्यात कसूर करून बघ्यावरच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून उफराटा न्याय करण्याचा प्रकार घडलेला आहे.
शनिवारी ठाणे महानगरपालिकेतर्फे घोडबंदर परिसरात कारवाई सुरू होती. ही कारवाई सुरू असताना या परिसरात पोलीस उपायुक्तांसह राज्य राखीव दलाची एक तुकडीही तैनात होती. दुपारी साडेबारा वाजता ही कारवाई सुरू असताना विजयनगरी या परिसरातील शिवसेना शाखाप्रमुख शौकत शेख हे बघे म्हणून तिथे उपस्थित होते.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वालही या कारवाईच्या वेळी तिथे उपस्थित असताना त्यांनी शेख यांची कॉलर पकडून फरफटत नेले. या दरम्यान शेख यांना आयुक्तांनी ‘ठोक दूंगा’ अशीही धमकी दिली. शेख यांना फरफटत नेत असताना त्यांच्या मानेवर नखांचे व्रणही उमटले. या घटनेची व्हीडिओ वायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासन अडचणीत आले.
याच दरम्यान शेख यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार ठाणे पोलिसांकडे केली. मात्र,ती घेण्यात आली नाही. दरम्यान, या घटनेनंतर ठाणे महापालिका आयुक्त व ठाणे महापालिकेची अब्रू वेशीवर टांगली गेली. त्यानंतर ठाणे महापालिकेतून कासारवडवली पोलिसांवर दबाव टाकण्यात आला.
पोलिसांनी शेख यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात महापालिकेतून वरिष्ठ स्तरावर हालचाली होऊन शहरविकास विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पवार यांना याबाबत अॅट्रोसिटीअंतर्गत शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानुसार पवार यांनी शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार कासारवडवली पोलिसांकडे केल्यानंतर शेख यांच्यावर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच त्यांना अटकही करण्यात आली. दरम्यान,बुधवारी शेख यांना ठाणे न्यायालयात हजर करता १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ठाणे महापालिका आयुक्तांनी कायदा हातात का घेतला?
प्रांतिक अधिनियमानुसार महापालिका आयुक्तांकडे अनेक अधिकार एकवटलेले आहेत. कारवाईत कोणत्याही व्यक्तीने हस्तक्षेप केल्यास आयुक्तांच्या सांगण्यावरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करता येतो. मात्र, शनिवारी ही कारवाई सुरू असताना तिथे पोलीस उपायुक्त चंदनशिवेंसह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांना शेख हे कारवाईत अडथळा आणतात असे वाटत असेल तर त्यांनी याची माहिती पोलिसांना देऊन कारवाईसाठीची पावले उचलणे आवश्यक होते. मात्र, आयुक्तांनी थेट शेख यांची कॉलर पकडून त्यांना फरफटत नेले. आयुक्तांनी कायदा का हातात घेतला याचे उत्तर मात्र महापालिका देण्यास हतबल आहे.