दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गिफ्ट मिळालेली कार चर्चेत आली असताना आता आम आदमी पक्षाच्या बोधचिन्हावरुन (लोगो) नवा वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गिफ्ट मिळालेली कार चर्चेत आली असताना आता आम आदमी पक्षाच्या बोधचिन्हावरुन (लोगो) नवा वाद निर्माण झाला आहे. आम आदमी पक्षाचा (आप) ‘लोगो’ आपण बनवला असून यापूढे तो पक्षाने वापरू नये, असे लखनऊमधील स्वयंसेवक सुनील लाल याने म्हटले आहे. या संदर्भात सुनील लाल याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्रही लिहिले आहे.
घर फिरले की घराचे वासेही फिरतात, अशी एक प्रचलित म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय सध्या केजरीवाल घेत आहेत. आम आदमी पक्षातील अंतर्गत कलह समोर आल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. दिल्लीत गेल्यावर्षी निळ्या वॅगन-आर मोटारीतून फिरणा-या अरविंद केजरीवाल यांना ही गाडी देणा-या ब्रिटनमधील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या कुंदन शर्मा यांनी मंगळवारी ‘आप‘मधील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत गाडी परत देण्याची मागणी केली आहे.
त्यानंतर आता बोधचिन्ह तयार करणारा पक्षाचा स्वयंसेवक सुनील लाल यानेही बुधवारी पक्षातील परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच ‘आप’चा ‘लोगो’ मी डिझाइन केला आहे. मात्र, आता मला या पक्षात रहायचे नाही. त्यामुळे ‘आप’ने माझा प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा स्विकारावा. तसेच यापुढे मी बनवलेल्या लोगोचा वापर बंद करावा. ब्रांडिंग, स्टेशनरी, वेबसाइट, बॅजेस, फ्लॅग्ज, पोस्टर, हँडबिल्स आणि बॅकड्रॉपवरून हा ‘लोगो’ काढून टाकावा, अशी सुचना वजा मागणी सुनील कुमारने केली आहे.