‘कामे अडवा पैसे जिरवा’ असा एककलमी कार्यक्रम राबवणा-या मुरबाड पंचायत समितीच्या पाटबंधारे उपविभागाने शेतक-यांना वा-यावर सोडून अधिकारी आणि कंत्राटदारांचे चांगभले करण्यावर भर दिला आहे.
ठाणे- ‘कामे अडवा पैसे जिरवा’ असा एककलमी कार्यक्रम राबवणा-या मुरबाड पंचायत समितीच्या पाटबंधारे उपविभागाने शेतक-यांना वा-यावर सोडून अधिकारी आणि कंत्राटदारांचे चांगभले करण्यावर भर दिला आहे.
कोकण टाइप (पद्धतीचा) बंधारा बांधकामासाठी निविदा मागणीचा कालावधी पंधरा दिवसांचा ठेवण्याऐवजी तीन दिवसांचा ठेवून निविदा प्रक्रियेत घोळ घातल्याचा आरोप होत आहे. तब्बल २२.५० लाख रुपये खर्चाच्या बंधा-याच्या बांधकामात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
मुरबाड तालुक्यातील खापरी येथे ‘कोकण टाइप’ बंधारा बांधण्याच्या कामास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी घेण्यात आली. या कामासाठी सरकारी निर्णयानुसार निविदा प्राप्तीचा कालावधी १५ दिवसांचा असतो. मात्र, मुरबाड पंचायत समितीने मर्जीतल्या कंत्राटदाराला धनलाभ होण्यासाठी हा कालावधी केवळ तीनच दिवसांचा ठेवला. या निविदा तीन भाषिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध न करता परस्पर ‘मॅनेज’ केल्याचा आरोप होत आहे. या कामासाठी प्राप्त तीन निविदांपैकी दोनच निविदा उघडण्यात आल्याने व फेरनिविदा न मागवल्याने स्पर्धात्मक दराचा लाभ झालेला नाही. ही बाब महाराष्ट्रात पंचायत राज संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातून उघड झाली आहे.
स्वामित्व धनावर पाणी सोडले
कंत्राटदाराकडून करून घ्यायच्या करारनाम्यात निर्धारित किमतीपेक्षा १३०० रुपयांचा मुद्रांक पेपर कमी वापरला आहे. नियमबाह्य पद्धतीने बांधण्यात आलेल्या ‘कोकण टाइप’ बंधा-याच्या कामाच्या देयकातून कंत्राटदाराकडून ‘स्वामित्व’धनाची (रॉयल्टी) तीस हजार ७३० रुपये वसूल करण्यात आलेली नाही. ‘व्हॅट’ (मूल्यवर्धित कर प्रणाली) नियमानुसार कार्यकंत्राट कराचे ४५ हजार हजार वसूल करण्यात आलेले नाहीत. या कामाचे मूल्यांकन २१ लाख ९५ हजार ३६६ रुपये असताना कार्यादेशामध्ये २२ लाख ३४ हजार ६२ रुपये एवढी रक्कम नमूद केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.
मासवणे बंधा-याचा खर्च ४३ वरून ७६ लाखांवर
मुरबाडमधील मासवणे येथील कोकण टाइप बंधा-याच्या बांधकामास ठाणे लघुपाटबंधारे मंडळाचे अधीक्षक-अभियंत्यांनी ३१ डिसेंबर २००२ रोजी तांत्रिक मंजुरी दिली होती. सुमारे ४३ लाख ८ हजार ९४६ रुपये खर्चाच्या बंधा-याच्या बांधकामास तांत्रिक मंजुरी मिळाली असताना त्यावर खर्च मात्र ७६ लाख ७ हजार ९१२ एवढाच करण्यात आला आहे. या कामासाठी तीन निविदांपैकी दोनच निविदा उघडण्यात आल्याने स्पर्धा होऊ शकली नाही.
स्पर्धात्मक दराचा लाभ होऊ शकला नाही. प्रादेशिक दरसूचीनुसार यूसीआर मशिनरी इन फाउंडेशन १.५ या बाबीसाठी २.८३ बॅग सिमेंट वापरायचे असताना २.५७ बॅग सिमेंट वापरल्याने एकूण २२२१.८४ घनमीटर मात्रेच्या कामावर ८६ हजार ५५० रुपयांचे सिमेंट कमी वापरण्यात आले. या बंधा-याचे काम जून २००४ पासून बंद असल्याने या कंत्राटदाराला नोटिसा बजावून जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी संबंधित कंत्राटदाराला कार्यवाही करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-याकडे २८ सप्टेंबर २००६ ला पत्रव्यवहार केला होता. मात्र याच कंत्राटदाराला ३१ मार्च २००९ पर्यंतच्या मुदतवाढीपेक्षा ३० जून २००९ पर्यंत मुदतवाढ दिल्याचा ठपका लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालात ठेवण्यात आला आहे. मौजे खापरी व मासवणे येथील या बंधा-याच्या कामात निविदेपासून ते काम पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराला पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप होत आहे.