आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, तेच आज मतांसाठी गांधीजींचे गुणगान गात आहेत, असा थेट हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चढवला.
मुंबई- ज्या आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, तेच आज मतांसाठी गांधीजींचे गुणगान गात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते, तेही आपलेच असल्याचा देखावा भाजपवाले करीत आहेत. यांची विचारसरणी देशासाठी घातक आहे, असा थेट हल्ला चढवत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भिवंडी येथील सभेत संघ आणि भाजपची लक्तरे चव्हाट्यावर मांडली. राजीव गांधी यांनी भारतात संगणक आणला तेव्हा विरोध करणारे हेच लोक संगणक आम्हीच आणला, असे सांगत आहेत. उद्या अन्न सुरक्षा योजना आणि माहितीचा अधिकारही आम्हीच आणला, असे सांगायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा सणसणीत टोला विरोधकांना लगावतानाच, काँग्रेस हा केवळ पक्ष नाही तर सर्वाना सोबत घेऊन जाणारी ती एक विचारधारा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौ-यावर आलेल्या राहुल गांधी यांची भव्य सभा भिवंडी येथे झाली. आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी भाजपच्या व्यक्तिकेंद्रित नेतृत्वावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, आमच्या विरोधकांकडे विचार नाहीत. ते फक्त हिंदु-मुसलमान यांना एकमेकांच्या विरोधात लढवितात, जातीजातीत भांडणे लावतात. त्यांच्याकडे स्वत:चा विचार नाही. निवडणुका आल्या की त्यांना परदेशातून विचार आयात करावा लागतो. काँग्रेसची विचारधारा या मातीतली आहे. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा, सम्राट अशोकांचा, महात्मा गांधींचा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा विचार आहे. सर्वाना बरोबर घेऊन चालणारी अशी ही विचारधारा आहे.
मतांसाठी आता सारे आमचेच, म्हणत श्रेय घेऊ पाहणा-या विरोधकांकडे स्वत:चा विचार नाही. काँग्रेसचे विचार आणि योजना या आपल्याच असल्याचे ही मंडळी सांगू लागली आहेत. राजीव गांधी यांनी ज्यावेळी या देशात संगणक आणला तेव्हा याच लोकांनी विरोध केला. संसदेत चर्चा झाली तेव्हा त्यावेळचे सर्वात बुजुर्ग असणारे भाजपचे नेते म्हणाले होते की, संगणक देशात आला तर इथल्या तरुणांना रोजगार मिळणार नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. परंतु राजीव गांधी यांनी मोठय़ा धाडसाने संगणकीय क्रांती घडवून आणली. त्यातून देशाची झालेली प्रगती आपण पाहतो आहोत. आज ही प्रगती पाहिल्यानंतर विरोधक आपणच देशात संगणक आणला, असे छातीठोकपणे सांगत आहेत. उद्या अन्न सुरक्षा योजना, माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना आम्हीच आणली, असे सांगण्यासाठीसुद्धा हे लोक कमी करणार नाहीत.
![Rahul Gandhi in Mumbai](http://prahaar.in/wp-content/uploads/2014/03/Congress-vice-president-Rahul-Gandhi-waves-along-with-MPCC-chief-Manikrao-Thakre-and-party-leader-Narayan-Rane.jpg)
या देशाला कोणतीही एक व्यक्ती पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही कधीही एकटय़ाने या देशाचा विकास केला, असे म्हणत नाही. या देशाचा विकास जर कोणी केला असेल तर तो या देशातल्या कष्टकरी, कामगारांनी केला आहे. हिंदू, मुस्लीम, कोळी, आगरी, कुणबी बांधवांनी केला आहे. आम्ही कष्टकरी, गरीब जनतेबद्दलचे विचार मांडतो आहोत. त्यांचे विचार काय आहेत? इंडिया शायनिंग! ते श्रीमंतीची भाषा बोलतात आणि आम्ही गरिबीची भाषा बोलतोय. सत्ता मिळाल्यास तीन महिन्यांत बदल घडवून आणू, असे ते सांगतात, तर आम्ही सर्वाना बरोबर घेऊन देश घडविण्याचा विचार मांडतोय, असे सांगून राहुल गांधी यांनी युपीए सरकारने आणलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.
महिलांना संसदेतही पुढे बसविणार
या देशाच्या जडणघडणीत महिलांचे स्थान मोठे आहे. मात्र या ठिकाणी महिला मागे बसलेल्या दिसत आहेत. त्यांना पुढे बसवा. इथे नव्हे तर संसदेतही त्यांना पुढे स्थान असायला हवे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी महिलांची संख्या पन्नास टक्के आहे. त्यांना संसदेत आणि काँग्रेस पक्षातही पन्नास टक्के वाटा मिळाला पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगताच महिलांनी टाळय़ांचा कडकडाट केला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, उद्योगमंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार मुझफ्फर हुसेन, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी, काँग्रेसचे गटनेते जावेदभाई दळवी, खासदार सुरेश टावरे, माजी खासदार दामू शिंगडा, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
ठाण्यात इंडस्ट्रियल हब करणार
ठाण्याचा झपाट्याने विकास होत आहे. त्या दृष्टीने ठाण्याला इंडस्ट्रियल हब बनवले जाईल. सध्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यातून १३ लाख नोक-या उपलब्ध होणार आहेत. त्याचा सर्वात जास्त फायदा ठाण्याला होईल, असेही ते म्हणाले. यंत्रमाग, मेगाक्लस्टर, विरार-अलिबाग कॉरिडॉर, मेट्रो यातून ठाणे जिल्हा मुंबईला थेट जोडण्याचे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
[EPSB]
राहुल गांधींची वर्सोव्यात कोळी बांधवांशी चर्चा
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मुंबईतील वर्सोवा येथील कोळी बांधवांची भेट घेतली.
[/EPSB]