गाडीवरील लाल दिवा काढण्याचे आदेश राज्याच्या गृहविभागाने देऊनही त्या आदेशाचे पालन केले जात नसल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना लाल दिवा भेट देत आपली लाल दिव्याची हौस भागवून घ्या, असा सल्ला दिला.
मुंबई- गाडीवरील लाल दिवा काढण्याचे आदेश राज्याच्या गृहविभागाने देऊनही त्या आदेशाचे पालन केले जात नसल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना लाल दिवा भेट देत आपली लाल दिव्याची हौस भागवून घ्या, असा सल्ला दिला.
या लाल दिव्यावरूनच महापालिकेत सुरू झालेल्या या गोंधळात, जोपर्यंत महापौर गाडीवरील लाल दिवा हटवत नाहीत, तोपर्यंत त्यांना रस्त्यावरून चालू देणार नाही, असा इशाराही काँग्रेसने दिला.
मात्र, सभागृहातील या गोंधळाबरोबरच विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नगरसेवकांनी चक्क महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या मारत दिवा काढण्यावरून आंदोलन करतानाच महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनाही निवेदन देऊन हा लाल दिवा त्वरित काढावा, अशी मागणी केली.
महापालिका सभागृहात दुपारी साडेबाराच्या सुमारास महापौरांनी कामकाज करण्यास सुरुवात केल्यानंतर या कामकाजाच्या प्रक्रियेवर काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत महापौरांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब सभागृहात मांडली.
राज्य सरकारच्या गृहविभागाने राजकीय पदाधिकारी व सरकारी अधिकाऱ्यांनी वाहनांवर दिवे लावण्यासंदर्भात नियमावली बनवली आहे. यामध्ये महापौरांना आपल्या वाहनावर लाल दिवा लावण्यास बंदी घातली आहे. परंतु त्यानंतरही महापौरांच्या वाहनांवर लाल दिवा लावून सरकारी नियमांचे उल्लंघन केले आहे.
सरकार कुठलेही असले तरी सरकारचे आदेश पाळले गेलेच पाहिजेत, असे सांगत महापौरांकडून या नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप करत छेडा यांनी लाल दिवा महापौरांना भेट म्हणून दिला. महापौरांना व्हीआयपी कल्चरलमध्ये राहायचे आहे, त्यांना सरकारी नियम पाळायचे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
हा लाल दिवा जोपर्यंत महापौर वाहनावरून काढत नाही तोपर्यंत सभागृह चालवू देणार नाही, असा इशारा देत काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सलग सहाव्या दिवशी गोंधळ कायम होता.
मात्र, हा हरकतीचा मुद्दा उडवून लावत महापौरांनी अर्थसंकल्पीय चर्चेला सुरुवात केली. यानंतर उपमहापौर अलका केरकर यांना पिठासीन अधिकारी म्हणून बसवत स्वत: दालनात निघून गेल्या.
महापौरांच्या दालनाबाहेर काँग्रेसची धरणे
महापौरांनी सभागृहातून पळ काढल्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनावर मोर्चा काढत तिथेच ठिय्या मारला.
यावेळी महापौर.. लाल दिवा काढा, महापौर हाय हाय.., दंड नही, फंड दो.., शिवसेनेची पुंगी वाजली रे.., अशा घोषणा देत महापालिका दणाणून सोडले. याचवेळी आंबेरकर यांच्यासह काँग्रेसच्या पाच नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेत त्यांच्या वाहनावरील लाल दिवा त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.