कळंब स्थानकाच्या परिसरात फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.
नेरळ – कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील कळंब या मोठय़ा लोकसंख्या असलेल्या गावात एसटीचे स्थानक आहे. मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी प्रवासी निवारा केंद्रही आहे. मात्र, स्थानकाच्या परिसरात फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.
कळंब बाजारपेठेमुळे या ठिकाणी एसटी स्थानक उभारण्यात आले. ही बाजारपेठ आता मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढली आहे. मात्र, एसटी स्थानकाच्या आवारातच काही विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावल्यामुळे प्रवाशांना थांबण्यास जागा उरलेली नाही. स्थानकाच्या निवारा शेडचा पुढील भाग हातगाडय़ा लावण्यासाठी वापरात आणला जात आहे. त्यामुळे आलेल्या एसटी दिसत नाही. एसटी पकडण्यासाठी हातगाडय़ांमधून कसरत करत जावे लागते. त्यामुळे वृद्ध प्रवाशांचे हाल होतात. एसटी महामंडळाने कळंब येथून वांगणी गाडी सुरू केली आहे. ही गाडी फायद्यात जात असल्यामुळे शेडकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कळंब एसटी स्थानकातून वारे, बोरगाव, ओलमण, मुरबाड, साळोख येथून आलेल्या एसटी गाडय़ा नेरळकडे किंवा कर्जतकडे जाण्यापूर्वी याच ठिकाणी विश्रांती घेतात. त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज निवारा शेड बांधण्याची मागणी होत आहे.