डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता, नादुरुस्त सोनोग्राफी व ईसीजी मशिन्स, एक्स रे मशिन्सपासून व्हेंटिलेटर मशिन बंदावस्थेत असल्याने गरोदर महिलांची होत असलेली परवड, अतिदक्षता विभाग, बर्न वॉर्ड, नवजात बालकांच्या वॉर्डमध्ये कोणत्याही सोयीसुविधा नाहीत.
कल्याण – डॉक्टर आणि परिचारिकांची कमतरता, नादुरुस्त सोनोग्राफी व ईसीजी मशिन्स, एक्स रे मशिन्सपासून व्हेंटिलेटर मशिन बंदावस्थेत असल्याने गरोदर महिलांची होत असलेली परवड, अतिदक्षता विभाग, बर्न वॉर्ड, नवजात बालकांच्या वॉर्डमध्ये कोणत्याही सोयीसुविधा नाहीत.
त्यातच अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य अशा बिकट परिस्थितीतून कल्याण-डोंबिवली महापालिकेची रुग्णालये जात असून संपूर्ण आरोग्य यंत्रणाच खिळखिळी झाली आहे.
केडीएमसी रुग्णालयांचा हा भोंगळ कारभार शुक्रवारी काँग्रेसने पदाधिका-यांच्या पाहणी दौ-यानंतर चव्हाटय़ावर आला आहे. पालिका रुग्णालयातून गरिबांसाठी कोणतेही उपचार मिळत नसल्याने ही रुणालये केवळ शोभेची ठरत असल्याचे काँग्रेसच्या दौ-यात निर्दशनास आले. पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाकडून कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोपही काँग्रेसतर्फे करण्यात आला.
महापालिका रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना कोणत्याही सोयीसुविधा मिळत नसून त्यांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी काँग्रेसकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेतील विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे आणि काँग्रेसचे गटनेते सचिन पोटे, विमल ठक्कर, अविनाश तिवारी यांनी डोंबिवलीतील शास्त्रीनगर व कल्याणमधील रुक्मिणीबाई या दोन रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली.
शास्त्रीनगर रुग्णालयातील बर्न वॉर्ड, अतिदक्षता विभाग आणि बेबी केअर सेंटर बंदावस्थेत आहेत. रुग्णांचे ईसीजी हे वॉर्ड बॉयकडून काढण्यात येतात. सोनोग्राफी मशिन्स आहेत मात्र डॉक्टर नाहीत. डायलेसिस सेंटरचे काम मागील तीन वर्षापासून सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. सरकारकडून रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर पुरवण्यात आले असले तरी डॉक्टर नसल्याने ते कपाटात ठेवण्यात आले आहेत.
प्रसूती विभागातील एका कॉटवर मांजराने विष्ठा केल्याचा प्रकारही या दौ-यात उघडकीस आला. रुग्णालयातील मंजुरी पदापैकी बालरोगतज्ज्ञ, ईएनटी, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडीओलॉजिस्ट अशा एकूण १२ डॉक्टरांची कमतरता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.
महिलांच्या बाह्यरुग्ण तपासणीला दरवाजा नाही. ईसीजी यंत्रणा बंदावस्थेत असून सोनोग्राफी मशिन्स नादुरुस्त आहे. त्यामुळे गरोदर महिलांना बाहेरूनच सोनाग्राफी करावी लागत आहे. नवजात बालकांचा वॉर्ड असला तरी तेथे डॉक्टरच नाहीत.
सत्ताधारी शिवसेना व भाजपचा कोणताही अंकुश नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शनिवारी १९ जुलै रोजी महासभेत या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी सांगितले. मागील पंधरा वर्षापासून सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपला जनतेच्या आरोग्याशी देणेघेणे नाही. महापौरांना आर्थिक विषयात रस असल्याची टीका गटनेता सचिन पोटे यांनी केली.
वैद्यकीय अधिका-याची अरेरावी
काँग्रेस पदाधिका-यांच्या दौ-यानंतर प्रशासनाची बाजू घेण्यासाठी गेलेल्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला पालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर मस्के यांनी काहीही बोलण्यास नकार देत सुरक्षारक्षकांकडून या पत्रकाराला बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडला. अधिका-याच्या अरेरावीविरोधात काँग्रेस पदाधिकारी, पत्रकारांनी त्यांच्या कार्यालयात धाव घेऊन संताप व्यक्त केल्यानंतर त्यांनी माफी मागितली.