कर्नाटकमधील विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा कर्नाटक सरकारने सोमवारी केली आहे.
बंगळूरु/धारवाड- कर्नाटकमधील विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा कर्नाटक सरकारने सोमवारी केली आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कलबुर्गी यांची रविवारी गोळी झाडून हत्या झाल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली. सर्व स्तरातून या हत्येचा निषेध करण्यात आला.
या हत्येचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाबरोबरच (सीआयडी) सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे कर्नाटकचे कायदा व संसदीय व्यवहारमंत्री टी. बी. जयेंद्र यांनी सांगितले.
सीआयडी या प्रकरणाच्या तपासाला तातडीने सुरुवात करणार आहे. तसेच सीबीआयलाही आम्ही या हत्येच्या तपासासाठी पत्र लिहिले आहे. ते कधीही तपास हाती घेऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असे गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांनी सांगितले. कलबुर्गी यांच्या हत्येमुळे कन्नड साहित्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. धारवाडमध्ये त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.