![karnataka map](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/08/karnataka-map.jpg)
हुबळी– इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नऊ संशयित दहशतवाद्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून यात एका पत्रकाराचा समावेश आहे.
कर्नाटकातील हुबळीमधून इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या चार संशयित दहशतवाद्यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. इंडियन मुजाहिद्दीन या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असून त्यांना 18 एप्रिल 2010 रोजी चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये बंगळुरु आणि मुंबई संघामध्ये आयपीएल सामन्यादरम्यान झालेल्या बाँबस्फोटात सहभाग असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात अफवा पसरवणारे आणि धमकावणारे एसएमएस पाठवले जात असल्याने राज्य सरकार आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर अफवांचे एसएमएस कोणीतरी पसरवत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर मोबाईल कंपन्यांच्या मदतीने हे क्रमांक शोधून काढून पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून पाच संशयिताना अटक केली.
हे नऊ जण एकमेकांशी संपर्कात होते आणि सगळे इंडियन मुजाहिदीन संघटनेशी जोडलेले आहेत, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी बंगळुरूतील एका दैनिकात काम करणा-या सिद्दीकी नावाच्या पत्रकारालाही उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. त्याचेही इंडियन मुजाहिद्दीनशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये 18 एप्रिल 2010 रोजी झालेल्या दोन बाँबस्फोटात 15 जण जखमी झाले होते.