माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांना पाकिस्तान दिनाबद्दलचे ट्विट महागात पडण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली– माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांना पाकिस्तान दिनाबद्दलचे ट्विट महागात पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तान दिनाच्या कार्यक्रमाहून परतल्यानंतर सिंह यांनी आपण तेथे केवळ ‘कर्तव्य व सरकारचे प्रतिनिधी’ या नात्याने उपस्थित होतो असे ट्विट केले होते.
मात्र त्यांच्या या विधानानंतर सरकारमध्ये विभिन्न मतप्रवाह आहेत का? याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. तर याच कार्यक्रमात पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद्यांनाही आमंत्रित केल्याने देशात संतापाची लाट उसळली होती.
मात्र पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला या गोष्टीचे स्पष्टीकरण मागण्याऐवजी आपल्याच मंत्र्याला स्पष्टीकरण मागितल्याने सरकारमध्ये मतभिन्नता असल्याचे अधोरेखित झाले आहे. वास्तविक या कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना भारत सरकारतर्फे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
मात्र स्वराज यांनी त्यास नकार दिला होता. त्यानंतर व्ही. के. सिंह यांना विचारणा केली असता त्यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नापसंती दर्शवली होती. मात्र सायंकाळच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानंतर पुन्हा एकदा स्वराज यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.
मात्र त्यांनी पुन्हा असमर्थता दाखवल्याने परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांना पाकिस्तानी वकिलातीतील या कार्यक्रमाला जाण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तेथून परतल्यानंतर त्यांनी आपण अनिच्छेने उपस्थित राहिल्याचे ट्विट केल्याने त्यांना आता पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.